हृदयद्रावक! नातवाचा मृतदेह खांद्यावर उचलून आजोबांनी न्याय मागण्यासाठी गाठलं पोलीस स्टेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 12:30 PM2023-12-18T12:30:04+5:302023-12-18T12:30:38+5:30
एका वृद्ध मजुराने आपल्या नातवाचा मृतदेह खांद्यावरून उचलून नेऊन न्याय मागण्यासाठी पोलीस ठाणं गाठलं, हे पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला.
उत्तर प्रदेशच्या कौशांबी जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका वृद्ध मजुराने आपल्या नातवाचा मृतदेह खांद्यावरून उचलून नेऊन न्याय मागण्यासाठी पोलीस ठाणं गाठलं, हे पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्यानंतर पोलिसांनी भट्टीमालकाकडून मजुरीचे पैसे घेतले आणि मजुराला दिले. भट्टीमालकाने मजुराचे पैसे वेळेवर दिले नाहीत, त्यामुळे नातवाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. नातवाचा मृतदेह गाडीतून गावी नेण्याइतके पैसेही मजुराकडे नव्हते.
पिपरी पोलीस स्टेशन हद्दीतील घुरी दिहा गावात ही घटना घडली आहे. येथे बिहारच्या गया येथील रहिवासी असलेले शामबली हे कुटुंबासह गगन वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करायचे. 6 वर्षांचा नातू रोहितची प्रकृती थंडीमुळे अचानक बिघडल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर शामबली यांनी आपल्या नातवाच्या उपचारासाठी भट्टी मालकाकडे मजुरीच्या पैशांची मागणी केली. परंतु, भट्टीमालकाने मजुराला पैसे दिले नाहीत. शामबली आपल्या नातवाच्या उपचारासाठी वारंवार पैशांची मागणी करत होते.
शामबलीच्या म्हणण्यानुसार, भट्टीमालकाने त्याला सांगितलं हों की, उपचाराशिवाय नातू बरा होईल. मात्र काही वेळाने रोहितची प्रकृती आणखी खालावली. उपचाराअभावी काही वेळातच रोहितचा मृत्यू झाला. यामुळे संतापलेल्या शामबलीने रोहितचा मृतदेह खांद्यावर घेऊन पोलीस ठाण्यात जाऊन न्याय मागितला. बाळाचा मृतदेह गावी नेण्याइतके पैसेही त्यांच्याकडे नव्हते. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर भट्टी मालकाने मजुराला पैसे परत केले.
शामबली सांगतात की, भट्टीमालकाने त्यांना वेळेवर पैसे दिले असते तर कदाचित आज त्यांचा नातू रोहित जिवंत असता. याप्रकरणी सीओ अभिषेक सिंह यांनी सांगितलं की, एका भट्टीवर काम करणाऱ्या व्यक्तीच्या मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी मिळाली, जो मूळचा गया येथील आहे. मृत्यू झालेल्या मुलाच्या वडिलांनी सांगितलं की, त्यांचा मुलगा थंडीमुळे आजारी पडला होता. यामुळे त्याचा मृत्यू झाला.