Anti-Collision Test Today: OMG! दोन ट्रेन आज फुल स्पीडमध्ये एकमेकांवर आदळवणार; रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव एका ट्रेनमध्ये असणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 10:18 AM2022-03-04T10:18:39+5:302022-03-04T10:19:06+5:30
Railways Anti-Collision Test Today: भारतीय रेल्वेसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा असणार आहे. सिकंदराबादमध्ये दोन रेल्वे फुल स्पीडमध्ये एकमेकांवर आदळवण्यात येणार आहेत. यापैकी एक ट्रेनमध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव असणार आहेत तर दुसऱ्या ट्रेनमध्ये रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि अन्य वरिष्ठ अधिकारी असणार आहेत. काय आहे नेमका प्रयोग....
भारतीय रेल्वेसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा असणार आहे. सिकंदराबादमध्ये दोन रेल्वे फुल स्पीडमध्ये एकमेकांवर आदळवण्यात येणार आहेत. यापैकी एक ट्रेनमध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव असणार आहेत तर दुसऱ्या ट्रेनमध्ये रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि अन्य वरिष्ठ अधिकारी असणार आहेत. या प्रयोगाद्वारे रेल्वेचे स्वदेशी तंत्रज्ञान 'कवच'ची चाचणी केली जाणार आहे.
'कवच' हे असे तंत्रज्ञान आहे ज्यामुळे दोन रेल्वे कधीच एकमेकांवर आदळणार नाहीत. ही जगातील सर्वात स्वस्त यंत्रणा आहे. रेल्वेला झिरो अॅक्सिडेंटचे लक्ष्य गाठायचे आहे. यासाठी आणि अपघातातील हानी टाळण्यासाठी कवच ही यंत्रणा बनविण्यात आली आहे. या तंत्राज्ञानामुळे जर या डिजिटल सिस्टिमला रेड सिग्नल किंवा अन्य कोणती नादुरुस्ती किंवा मानवी चूक दिसली तरी रेल्वे जागच्या जागी थांबते. एकदा का ही यंत्रणा लागू झाली की ती राबविण्यासाठी प्रती किमी ५० लाख रुपयांचा खर्च येणार आहे. जगभरात यासाठी २ कोटी रुपये खर्च येतो.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव सनतनगर-शंकरपल्ली विभागावरील यंत्रणेच्या चाचणीचा भाग म्हणून सिकंदराबादमध्ये असतील. रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "रेल्वे मंत्री आणि सीआरबी (रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष) ४ मार्च रोजी होणाऱ्या चाचणीत सहभागी होतील. तीन परिस्थितींमध्ये ही यंत्रणा कशी काम करते ते आम्ही दाखवू."
जेव्हा ट्रेन अशा सिग्नलवरून जाते, जिथे तिला जाण्याची परवानगी नसते, तेव्हा त्यातून धोक्याचा सिग्नल पाठविला जातो. जर लोको पायलट ट्रेन थांबवण्यात अयशस्वी ठरला, तर 'कवच' तंत्रज्ञानाद्वारे ट्रेनचे ब्रेक आपोआप लागू होतात आणि ट्रेन कोणत्याही अपघातापासून वाचते. अधिकाऱ्याने सांगितले की, हे तंत्रज्ञान हाय फ्रिक्वेन्सी रेडिओ कम्युनिकेशनवर काम करते. यासोबतच, ते SIL-4 (सिस्टम इंटिग्रिटी लेव्हल-4) शी सुसंगत आहे, जे सुरक्षा तंत्राचा सर्वोच्च स्तर आहे, असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. यंदाच्या बजेटमध्ये या कवच यंत्रणेची घोषणा करण्यात आली होती.