२0 किलो सोन्याचे दागिने घालून गोल्डन बाबा निघाले कावड यात्रेला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 06:14 AM2018-08-02T06:14:56+5:302018-08-02T06:17:41+5:30
‘गोल्डन बाबा’ यावेळीही अंगभर सोन्याचे दागदागिने लेवून कावड यात्रेला निघाले आहेत. त्यांची यंदाची ही २५ वी कावड यात्रा आहे. त्यांनी यावेळी २० किलो सोन्याचे दागिने परिधान केली आहेत.
नवी दिल्ली : ‘गोल्डन बाबा’ यावेळीही अंगभर सोन्याचे दागदागिने लेवून कावड यात्रेला निघाले आहेत. त्यांची यंदाची ही २५ वी कावड यात्रा आहे. त्यांनी यावेळी २० किलो सोन्याचे दागिने परिधान केली आहेत. त्यांच्या अंगावरील सोन्याची किंमत बाजारभावानुसार अंदाजे ६ कोटी रुपये असेल. दर यात्रेला त्यांच्या अंगावर तोळा-मासाने नव्हे, तर किलोने सोने लगडलेले असते. मागच्या वर्षी त्यांनी साडेचौदा किलो सोन्याचे दागिने परिधान केले होते. २०१६ मध्येही त्यांच्या अंगावर १२ किलो सोने होते.
यंदा त्यांच्या कावड यात्रेचे रौप्य वर्ष असल्याने ते अशा थाटामाटात कावड यात्रेत सहभागी झाले आहेत. बाबांचे मूळ नाव सुधीर मक्कर आहे.
एक बीएमडब्ल्यू, ३ फॉर्च्युनर, २ आॅडी
लवाजाम्यासह यात्रेत त्यांचा स्वतंत्र ताफा आणि जथा असतो. अंगभर सोने लेवून यात्रेला निघालेले गोल्डन बाबा २७ लाखांची रॉलेक्स घड्याळ वापरतात. ताफ्यात त्यांची बीएमडब्ल्यू, तीन फॉर्च्युनर, दोन आॅडी व दोन इनोव्हा कार आहेत. हरिद्वारला जाण्यासाठी ते हुमर, जग्वार आणि लँड रोव्हर, अशा आलिशान गाड्याही भाड्याने घेतात.
सोन्याचा त्यांना भारी शौक आहे. १९७२-७३ मध्ये सोन्याचा भाव दोनशे रुपये तोळा होता, तेव्हा ते चार तोळे सोन्याचे दागिने घालीत असत. ही भोलेबाबाची कृपा आहे. इहलोकाचा निरोप घेईन तेव्ही हे सोने मी माझ्या पट्टशिष्याकडे सुपूर्द करील, असे गोल्डन बाबा सांगतात.
आधी व्यवसाय, आता बाबा
बाबा होण्यापूर्वी त्यांचा दिल्लीत गांधीनगर मार्केटमध्ये कापड व स्थावर मालमत्तेचा व्यवसाय होता. गाझियाबादमध्ये त्यांचा एक आलिशान फ्लॅट आहे. यात्रेत गोल्डन बाबाला पाहण्यासाठी मुले, महिला मोठ्या उत्सुकतनेने वाट पाहत असतात. अनेक जण त्यांच्यासोबत व्हिडिओ चित्रण करतात. सेल्फी घेतात.