KBC 13 : 'राजीव गांधींनी सुरू केलेल्या नवोदय विद्यालयामुळेच गरीब साहिलने 1 कोटी जिंकले'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 11:55 PM2021-10-22T23:55:03+5:302021-10-22T23:55:58+5:30
KBC 13 : साहिल यांनी 1 कोटी रुपयांच्या प्रश्नाचे अगदी बरोबर उत्तर दिले. त्यानंतर, 7 कोटी रुपयांच्या प्रश्नावर ते अडकून पडले. त्यामुळे, त्यांनी गेम क्विट करुन खेळ सोडण्याचा निर्णय घेतला.
मुंबई - मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या साहिल आदित्य अहिलवार या युवकाने कौन बनेगा करोडपतीच्या 13 व्या सिझनमध्ये 1 कोटी रुपये जिंकून यंदाच्या सीझनमधील दुसरा करोडपती होण्याचा मान पटकावला आहे. साहिल हे 20 ऑक्टोबर रोजी अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉटसीटवर बसले होते. आपल्या बुद्धीकौशल्याच्या जोरावर त्यांनी 1 करोड रुपये जिंकून दाखवले. 21 ऑक्टोबर रोजी 7 कोटी रुपयांसाठी त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. केबीसीच्या हॉटसीटवरुन त्यांनी नवोदय विद्यालयाचं महत्त्व अधोरेखीत केलं.
साहिल यांनी 1 कोटी रुपयांच्या प्रश्नाचे अगदी बरोबर उत्तर दिले. त्यानंतर, 7 कोटी रुपयांच्या प्रश्नावर ते अडकून पडले. त्यामुळे, त्यांनी गेम क्विट करुन खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, साहिल यांनी शानदार खेळ केल्यामुळे अमिताभ बच्चन यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले. दरम्यान, केबीसीच्या हॉटसीवरुन, साहिल यांनी आपल्या शैक्षणिक आणि केबीसीपर्यंतच्या प्रवासात नवोदय विद्यालयाचे महत्त्वाचे योगदान असल्याचे सांगितले. तसेच, नवोदय विद्यालयाची माहितीही दिली. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी देशातील गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी 1986 साली नवोदय विद्यालयाची स्थापन केली. या विद्यालयातून 6 वी ते 12 वी पर्यंतचं शिक्षण मोफत दिलं जातं. त्यासाठी, इयत्ता 5 वी मध्ये शिकताना तुम्हाला एक परीक्षा पास व्हावी लागते, त्यामधून निवड झाल्यानंतर तुम्हाला नवोदय विद्यालयात प्रवेश मिळतो, असे साहिल यांनी सांगितले.
स्वर्गीय श्री राजीव गांधी द्वारा चलाए नवोदय विद्यालय के गरीब परिवार के नौजवान साहिल ने #KBC में एक करोड़ रुपये जीत कर साबित कर दिया उस स्कीम का शिक्षा में शानदार योगदान।
— Pawan Kumar Bansal (@pawanbansal_chd) October 21, 2021
दरम्यान, माजी खासदार आणि काँग्रेस नेते पवनकुमार बन्सल यांनीही ट्विट करुन साहिल यांचं अभिनंदन केलं आहे. तसेच, स्वर्गीय राजीव गांधी यांच्याद्वारे चालविण्यात आलेल्या नवोदय विद्यालयातील, गरिब कुटुंबातील युवक साहिलने केबीसीमध्ये 1 कोटी रुपये जिंकले. नवोदयच्या योजनेचे शिक्षण क्षेत्रात असलेलं मोठं योगदान साहिलंनं दाखवून दिलंय, असेही बन्सल यांनी ट्विट करुन म्हटलं आहे.
तापसी पन्नूनेही केलंय अभिनंदन
विशेष म्हणजे साहिल यांची आवडती अभिनेत्री असलेल्या तापसी पन्नूनेही साहिलचे ट्विटरवरुन अभिनंदन केलंय. तसेच, कधी भेट झाल्यास छोले भटुरे आवर्जून खाऊयात, असेही तापसीने म्हटले आहे. या खेळात अमिताभ यांनी साहिलला आवडती अभिनेत्री कोण? असा प्रश्न विचारला होता. त्यावर, साहिल यांनी तापसी पन्नू हिचं नाव घेत तीच माझा क्रश असल्याचं म्हटलं. तसेच, तापसीला काय आवडतं असंही त्यांनी विचारलं होतं. त्यावर, तापसीने मला छोले भटुरे आवडत असल्याचे सांगितले. दरम्यान, साहिल सध्या बी.ए. पदवीचे शिक्षण घेत आहेत, त्याचे वडिल सुरक्षा गार्ड असून नोएडा येथे 15 हजार रुपयांची नोकरी करतात. तर, साहिलने नवोदय विद्यालयातून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. लहानपणापासूनच ते अतिशय हुशार विद्यार्थी होते.