काँग्रेसशी सहमतीसाठी केसीआर अनुकूल? पडद्याआडून हालचाली सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 05:19 AM2019-05-10T05:19:20+5:302019-05-10T05:34:16+5:30
निवडणूक निकालानंतर त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात आल्यास सरकारस्थापनेसाठी काँग्रेसला सहकार्य करण्यास तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) अनुकूल दिसत आहेत.
नवी दिल्ली : निवडणूक निकालानंतर त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात आल्यास सरकारस्थापनेसाठी काँग्रेसला सहकार्य करण्यास तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) अनुकूल दिसत आहेत. त्यांनी तशा हालचाली सुरू केल्याचे सांगण्यात येते.
तेलंगणात मतदान झाल्यानंतर केसीआर यांनी एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याची भेट घेऊन निवडणुकीनंतर निर्माण होऊ शकणाऱ्या स्थितीवर चर्चा केली. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी अशी बैठक झाल्याचे मान्य केले. लोकसभा निवडणुकांत या दोन पक्षांची आघाडी नसली तरी निवडणुकांनंतर परिस्थिती पालटू शकते, असे सूचक विधान तेलंगणा राष्ट्र समितीच्या सूत्रांनी केले आहे.
भाजप व काँग्रेसला दूर ठेवून लोकसभा निवडणुका निकालानंतर प्रादेशिक पक्षांची आघाडी स्थापन करण्यासाठी केसीआर प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. पण आता ते काँग्रेसशीही सहकार्य करण्यास तयार आहेत. मात्र त्यांनी अद्याप तशी अधिकृत घोषणा केलेली नाही.
लोकसभा निवडणुकांत भाजपचा मुकाबला करण्यासाठी विरोधी पक्षांची आघाडी स्थापन करण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला. पण तेलंगणा राष्ट्र समितीने त्यापासून दूर राहिली होती.
जगनमोहनशी संपर्क
आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी जाहीर केल्यानंतर त्यांचे राजकीय शत्रू केसीआर काहीसे सुखावले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसशी जवळीक साधण्याचे प्रयत्न सुरू केले. नायडूंचे विरोधक असलेल्या वायएसआर काँग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी यांच्याशीही केसीआर यांनी संधान बांधले आहे.