केसीआर यांनी यादागिरीगुट्टाच्या माकडांना खाऊ घातली केळी!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 02:17 AM2020-09-15T02:17:23+5:302020-09-15T02:18:21+5:30
भारतात माकडांना पवित्र समजले जाते. विशेषत: तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी त्यांना हनुमानाचे प्रतिनिधी म्हणून पाहिले जाते.
हैदराबाद : तेलंगणातील यादागिरीगुट्टा येथील प्रसिद्ध लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिराच्या पहाडांत राहणाऱ्या माकडांची टोळी पाहून या राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या वाहनांचा ताफा थांबविला. या माकडांना त्यांनी केळी खायला दिल्यानंतरच ते पुढील प्रवासास रवाना झाले.
मंदिराच्या बांधकामाचा आढावा घेण्यासाठी के. चंद्रशेखर राव हे यादागिरी दौºयावर आले होते. दौºयावरून परतत असताना त्यांना रस्त्याच्या कडेला लाल माकडांची झुंड दिसली. राव यांनी वाहनांचा ताफा थांबविला. ते आपल्या गाडीतून खाली उतरले. त्यांनी माकडांना केळी खायला दिली. फळे त्यांनी वाहनांत सोबत आणली होती.
मुख्यमंत्री राव यांचे माकडांना खाऊ घालतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. भारतात माकडांना पवित्र समजले जाते. विशेषत: तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी त्यांना हनुमानाचे प्रतिनिधी म्हणून पाहिले जाते. विशेष म्हणजे येथील मंदिरात हनुमान ‘क्षेत्रपाल’ आहे. तो मंदिर आणि आजूबाजूच्या परिसराचे रक्षण करतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. येथील मंदिराचा जीर्णोद्धार आणि पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. येथे हनुमानाची १०८ फूट उंच मूर्ती उभारण्यात येणार आहे.