केसीआर यांचा आज शपथविधी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 06:27 AM2018-12-13T06:27:35+5:302018-12-13T06:27:53+5:30
तेलंगणात पुन्हा बाजी मारणारे टीआरएसचे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांची बुधवारी अपेक्षेप्रमाणे विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड झाली.
हैदराबाद : तेलंगणात पुन्हा बाजी मारणारे टीआरएसचे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांची बुधवारी अपेक्षेप्रमाणे विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड झाली. त्यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी गुरुवारी होणार आहे. आत त्यांना आश्वासने ठराविक मुदतीत पूर्ण करावी लागतील. राज्यातील ११९ जागांपैकी तब्बल ८८ जागा त्यांच्या पक्षाने जिंकल्या.
केसीआर यांनी येत्या मार्चपर्यंत राज्यातील एक कोटी एकर जमीन सिंचनाखाली आणण्याचे आश्वासन प्रचारात दिले. कालेश्वरम जलसिंचन प्रकल्प मुदतीत पूर्ण करण्यात येईल असेही त्यांनी ठासून सांगितले होते. अन्न, वस्त्र, निवारा यासंबंधीच्या आश्वासनांना जनता भुलते हे राजकारण्यांना माहीत असते. जनतेसाठी दोन बीएचके आकाराच्या दीड लाख घरांचे सुरू असलेले बांधकाम, निवडणूक आचारसंहितेमुळे कंत्राटदारांना निधी न मिळाल्याने थांबले होते. त्यांनी २०२४ पर्यंत राज्यात साडेपाच लाख घरे बांधण्याचे आश्वासन दिले आहे. ही घरे वेगाने पूर्ण करून त्यांचा ताबा लोकांना लवकरात लवकर द्यावा लागेल.
सुमारे अडीच कोटी लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी नळांची जोडणी, भागीरथी योजनेच्या अंतर्गत सर्वांना पिण्याचे पाणी, शेतकऱ्यांना १ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी अशी अनेक आश्वासने केसीआरना मुख्यमंत्रीपदाच्या दुसºया कारकीर्दीत पूर्ण करावी लागतील. तीच त्यांच्यासाठी अग्निपरीक्षा ठरणार आहे. टीआरएसला ४६.३८ टक्के मते मिळाली. गेल्या निवडणुकांत हे प्रमाण ३४.०४ टक्के होते.काँग्रेस, टीडीपी, सीपीआय, टीजीएस यांना मिळून गेल्या वेळी वेगळे लढूनही एकत्रितपणे ४०.४६ टक्के मते मिळाली होती. यंदा एकत्र लढूनही या पक्षांची मते ८ टक्क्यांनी घसरून ३२.६९ टक्क्यांवर आली. म्हणजेच तिथे जी महाआघाडी झाली होती, ती आपला प्रभाव पाडूच शकली नाही.
पराभव सहन न झाल्याने दोघे थेट रुग्णालयात
निवडणुकांतील पराभवाचा धक्का सहन न होऊन प्रकृती बिघडल्याने दोन उमेदवारांना मंगळवारी रुग्णालयात दाखल करावे लागले. नालगोंडातील काँग्रेसचे उमेदवार कोमतीरेड्डी वेंकट रेड्डी व पलैर येथील टीआरएसचे उमेदवार नागेश्वर राव हे सध्या उपचार घेत आहेत.