केदारनाथ महाप्रलय : सहा वर्षांनी परतला 'विधवे'चा पती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 10:44 AM2020-01-03T10:44:54+5:302020-01-03T10:45:26+5:30
Kedarnath Flood : पोलिसांनी ऑपरेशन स्माईल नावाची मोहिम राबविली आहे. या मोहिमेद्वारे मोबिन यांच्या पतीला शोधण्यात आले.
देहरादून : केदारनाथमध्ये 2013 ला महाप्रलय आला होता. यामध्ये 169 भाविकांचा मृत्यू तर 4021 जण बेपत्ता झाले होते. गेल्या सहा वर्षांपासून उत्तराखंडच्या उधमसिंहनगर जिल्ह्यातील सितारगंजच्या 62 वर्षांची महिला मोबिन अन्सारी या विधवेचे जीवन जगत होत्या. कारण त्यांचे पती केदारनाथ दुर्घटनेनंतर बेपत्ता झाले होते. त्यांचा शोध न लागल्याने मृत्यू झाल्याचे मानले गेले होते. मात्र, 31 डिसेंबरला मोबिन यांना एक व्हिडिओ कॉल आला आणि धक्काच बसला. हा कॉल त्यांच्या पतीचाच होता.
पोलिसांनी ऑपरेशन स्माईल नावाची मोहिम राबविली आहे. या मोहिमेद्वारे मोबिन यांच्या पतीला शोधण्यात आले. केदारनाथ दुर्घटनेनंतर जमील यांची स्मरणशक्ती गेली होती. यामुळे त्यांना चमोलीच्या गोपेश्वरमधील निवारा केंद्रामध्ये ठेवण्यात आले होते. पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांचे काही फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करून त्यांना शोधले. हे नवीन वर्ष मोबिन यांच्यासाठी आनंदाचे ठरले. 1 जानेवारीला जमील त्यांच्या कुटुंबीयांना भेटले.
चमोली जिल्ह्यामध्ये ऑपरेशन स्माईल राबविणारे उप निरिक्षक नितीन बिष्ट यांनी सांगितले की, जमील 2013 मध्ये लंबागडयेथे मजुरी करायचे. जेव्हा केदारनाथ महाप्रलय आला तेव्हा ते अलकनंदा नदीमधून वाहून गेले. यानंतर काय झाले हे त्यांना आठवत नव्हते. पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांना 2016 मध्ये एका निवारा केंद्रामध्ये पाहिले. यानंतर त्यांच्या कुटुंबाचा शोध सुरू केला.
चौकशीवेळी त्यांनी त्यांचे नाव जहीर खान असल्याचे सांगितले. मात्र, यंदाच्या डिसेंबरमध्ये पुन्हा पोलिस त्यांना भेटले तेव्हा त्यांनी जमील नाव असल्याचे सांगितले. यानंतर जमील यांचे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करण्यात आले. हे फोटो त्यांच्या भाच्याने ओळखले आणि पोलिसांशी संपर्क केला. यानंतर 31 डिसेंबरला जमील यांचे मोबिन यांच्याशी फोनवर बोलणे करून देण्यात आले. मोबिन यांना व्हिडिओ कॉल आला आणि समोर त्यांचाच मृत झालेला पती पाहून धक्काच बसला. त्यांना परिस्थिती समजाविण्यात आली. यानंतर १ जानेवारीला मोबिन आणि त्यांच्या मुलाने गोपेश्वरला जाऊन जमील यांनी भेटले.