Kedarnath: केदारनाथमध्ये हरवलं महिलेचं कुटुंब, मग घडला असा चमत्कार, ऐकून तुम्हीही म्हणाल...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 10:24 AM2023-05-12T10:24:25+5:302023-05-12T10:25:10+5:30
Kedarnath: केदारनाथच्या तीर्थयात्रेसाठी एक महिला सहकुटुंब येथे आली होती. पवित्र ठिकाणी आल्याने आनंदात असलेली ही महिला गर्दीत कुटुंबीयांपासून वेगळी झाली. भाषेच्या समस्येमुळे ती या अनोळखी ठिकाणी हरवली. त्यानंतर...
केदारनाथच्या तीर्थयात्रेसाठी एक महिला सहकुटुंब येथे आली होती. पवित्र ठिकाणी आल्याने आनंदात असलेली ही महिला गर्दीत कुटुंबीयांपासून वेगळी झाली. भाषेच्या समस्येमुळे ती या अनोळखी ठिकाणी हरवली. भाषेची समस्या असल्याने तिला संपर्क साधता येईना. त्यामुळे तिला एकाकी वाटू लागले. त्यानंतर तिने तांत्रिक मदत घेण्याचा विचार केला. तिने गुगल ट्रान्सलेटची मदत घेतली. त्यामुळे ती अनोळखी लोकांशी संवाद साधण्यात यशस्वी झाली. त्यांनी तिची कुटुंबीयांशी पुन्हा भेट घालून देण्यात मदत केली.
ही ६८ वर्षीय महिला आंध्र प्रदेशमधील असून, ती तेलुगू भाषा चांगल्या पद्धतीने जाणते. मात्र हिंदी आणि इंग्रजीतून बोलण्यात असमर्थ होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खराब हवामानामुळे केदारनाथमधून परतत असताना ही महिला कुटुंबीयांपासून वेगळी झाली. ती गौरीकुंड शटल पार्किंगमध्ये होती. या महिलेला पोलीस अधिकाऱ्यांसोबत हिंदी किंवा इंग्रजीमध्ये संवाद साधता येत नव्हता.
पोलीस इन्स्पेक्टर रमेशचंद्र बेलवाल यांनी पीटीआय-भाषा ला सांगितले की, आम्ही जेव्हा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती हिंदी किंवा इंग्रजीत बोलू शकत नसल्याचे दिसून आहे. आम्ही तिला हावभावांच्या मदतीने तिचं कुटुंब पुन्हा मिळेल, असं सांगितलं. आम्ही तिला पाणी पाजले. तसेच ती जे काही सांगण्याचा प्रयत्न करत होती, त्याची व्याख्या करण्यासाठी गुगल ट्रान्सलेटची मदत घेतली.
जेव्हा पोलिसांनी महिलेने तेलुगूमध्ये सांगितलेला नंबर डायल केला, तेव्हा समजले की, तिचं कुटुंब हे सोनप्रयाग येथे होतं. हे ठिकाण गौरीकुंड येथून सुमारे ८ किमी दूर आहे. वृद्ध महिला एकटी राहिली होती. तर तिचं कुटुंब तिला शोधत होतं. अखेर पोलिसांनी गुगल ट्रान्सलेटच्या माध्यमातून या महिलेच्या कुटुंबाशी संपर्क साधण्यात यश मिळवलं. एका वृत्तसंस्थेला सांगितले की, या महिलेच्या कुटुंबीयांची माहिती समजल्यानंतर पोलिसांनी एका विशेष गाडीची व्यवस्था करून या महिलेला सोनप्रयाग येथे नेले. तिथे तिच्या कुटुंबाशी भेट घालून देण्यात आली.