'अहंकार बाजूला ठेवून सर्वांचा विश्वास जिंकू या!'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 06:30 AM2019-05-26T06:30:08+5:302019-05-26T06:30:27+5:30
नवा समर्थ भारत उभारण्याचा संकल्प घेऊन पाच वर्षांपूर्वी एक ध्येयवादी वाटचाल आपण सुरू केली.
नवी दिल्ली : नवा समर्थ भारत उभारण्याचा संकल्प घेऊन पाच वर्षांपूर्वी एक ध्येयवादी वाटचाल आपण सुरू केली. देशाच्या जनतेने यास केवळ पसंतीच दिलेली नाही, तर नागरिक एक जनआंदोलन म्हणून यात सक्रियतेने सहभागी होण्यास उतावीळ आहेत, हाच नव्या जनादेशाचा अर्थ आहे. त्यामुळे अहंकाराला बिलकूल थारा न देता सेवाभावाने हा संकल्प पूर्ण करण्यासाठीच पुढील पाच वर्षे काम केले जाईल, अशी ग्वाही देत नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या पर्वाच्या वाटचालीतील पहिले पाऊल शनिवारी टाकले.
लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) नेता व देशाचे भावी पंतप्रधान म्हणून एकमताने निवड केल्यानंतर संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये मोदी बोलत होते. आघाडीतील सर्व सहकारी पक्षांचा व त्यांच्या नेत्यांचाही या यशात तेवढाच मोठा सहभाग आहे, असे सांगून मोदी यांनी सर्वांचे अभिनंदन करत आभार मानले.
मोदी म्हणाले, या जनादेशाने आपल्याला नवी ऊर्जा मिळाली आहे तशीच जबाबदीरीही खूप वाढली आहे. लोकांनी आपला सेवाभाव, परिश्रम व सचोटी यावर भरवसा ठेवून आपल्याला पुन्हा संधी दिली आहे. त्यामुळे हे यश आपले नसून जनतेने त्यांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडताना अहंकाराला जराही थारा न देता माझ्यासह प्रत्येकाला एक कार्यकर्ता बनून पूर्ण समर्पणाने झोकून द्यावे लागेल.
मोदी असेही म्हणाले की, आता देशाचे सरकार चालविताना आपल्याला ज्यांनी साथ दिली त्यांना व ज्यांनी विरोध केला अशा सर्वांना बरोबर जायचे आहे. आधी आपला ‘सबका साथ, सबका विकास’ हा नारा होता. आता आपल्याला याला ‘सबका विश्वास’ जोडायचे आहे. ही निवडणूक आपण जिंकलेली नसून मतदारांनी स्वत:हून आपली निवड केली आहे. मतदारांनी टाकलेला हा विश्वास म्हणजे आपल्याला जीवनऊर्जा देणारी गर्भनाळ आहे. ती कधीही तुटू न देण्याचे भान आपल्याला सदैव ठेवावे लागेल.
भाजपाला स्वबळावर पूर्ण बहुमत मिळाले असले तरी संपूर्ण ‘एनडीए’ला बरोबर घेऊन जाणे हे केवळ राजकारण नाही. ती एक राष्ट्रीय गरज आहे, असे सांगून मोदी म्हणाले की, प्रादेशिक अस्मिता व आकांक्षांना पूर्ण आदर देत राष्ट्रीय महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी एकपक्षीय शासनापेक्षा आघाडीचे सरकार हिच आदर्श व्यवस्था आहे, असेही मोदी म्हणाले.
मोदी पुढे असेही म्हणाले की, आजवर समाजाला जात, पात, धर्म, पंथ याआधारे गटागटांमध्ये वाटून त्यानुसार राजकारण केले गेले. गरिबी आणि गरीब हेही राजकीय स्वार्थ साध्य करण्याचे एक साधन मानले गेले. आपल्याला या सर्वांवर मात करून काम करावे लागणार आहे. यासाठी आपल्याला बदलावे लागेल. सत्ताभावावर जसजशी मात कराल तसा सेवाभाव वाढत जाईल व सेवाभाव जेवढा दृढ होईल तेवढाच जनतेचा आशिर्वाद वाढत जाईल.
मी गेली पाच वर्षे याच भावनेने काम केले.
जनता जनार्दन ईश्वराचे रूप असते असे पूर्वी ऐकले होते. निवडणुकांच्या निमित्ताने याचा मला प्रत्यक्ष साक्षात्कार झाला. म्हणूनच निवडणूक ही माझ्यासाठी एक तीर्थयात्रा होती, असेही मोदींनी सांगितले.
>दलालांपासून सावध!
प्रथमच निवडून आलेल्या खासदारांना मोदींनी सांगितले की, दिल्लीत तुम्हाला न मागताही अनेक प्रकारची मदत करायला तत्परता दाखविणारे अनेक जण भेटतील. पण अशा दलालांपासून सावध राहा.
सभागृहात किंवा माध्यमांशी बोलताना टीव्हीवर दिसेन म्हणून बोलण्याचा मोह टाळा. त्याने अडचणीत याल, असेही त्यांनी सावध केले.
>मोदींनी भाषण सुरू करण्याआधी सभागृहात ठेवलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतीला नमन केले. नंतर भाषणातही त्यांनी या संविधानाशी बांधिलकीचा वारंवार उल्लेख केला. व्यासपीठावर मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत लालकृष्ण आडवाणी व डॉ. मुरली मनोहर जोशी या ज्येष्ठ मार्गदर्शक नेत्यांना सन्मानाने स्थान देण्यात आले होते. नेतेपदी निवड झाल्यावर इतरांनी मोदी बसले होते त्या जागेवर येऊन त्यांना पुष्पगुच्छ दिले. पण मोदींनी जागेवरून उठून आडवाणी व जोशी यांच्यापाशी जात त्यांचे अभिनंदन विनम्रतेने स्वीकारले. भाषणाच्या आधी व मध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांना उपस्थितांनी बाके वाजवून व ‘मोदी.. मोदी..’ असा घोशा लावून उत्स्फूर्तपणे साथ दिली. कार्यक्रमाची सुरुवात ‘वंदे मातरम्’ने झाली. आजारी असलेल्या अरुण जेटली यांची अनुपस्थिती मात्र प्रकर्षाने जाणवली.