जाधव यांच्याबाबत मानवीय दृष्टिकोन ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 04:02 AM2017-12-30T04:02:35+5:302017-12-30T04:02:47+5:30
पाकिस्तानच्या ताब्यात असलेले कुलभूषण जाधव यांच्याबाबत मानवीय दृष्टिकोन ठेवा, असे आवाहन जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी पाकिस्तानला केले आहे.
जम्मू : पाकिस्तानच्या ताब्यात असलेले कुलभूषण जाधव यांच्याबाबत मानवीय दृष्टिकोन ठेवा, असे आवाहन जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी पाकिस्तानला केले आहे. जाधव यांची आई आणि पत्नी यांना पाकिस्तानने अपमानास्पद वागणूक दिल्याचे पडसाद सध्या उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, मानवतेच्या वागणुकीकडे राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहायला हवे. मेहबूबा मुफ्ती यांनी उर्दूतून टिष्ट्वट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
उपमुख्यमंत्री निर्मल सिंह आणि रस्ते विकास विभागाचे मंत्री नईम अख्तर यांनीही पाकिस्तानच्या वागणुकीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सिंह म्हणाले की, ही पाकिस्तानची अमानवीयता आहे. लोकांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे. जगाच्या समोर पाकिस्तानचा चेहरा उघडा पडला आहे.
मेहबूबा मुफ्ती यांचे भाऊ तसादुक मुफ्ती यांचा नुकताच मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. ते म्हणाले की, मानवतेवर विश्वास न ठेवणे ही पाकिस्तानची वास्तविकता आहे. रस्ते विकास विभागाचे मंत्री नईम अख्तर शस्त्रसंधीबाबत बोलताना म्हणाले की, आम्ही गोळीबार करणार नाही, पण पाकिस्तानकडून जर शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असेल तर त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल. (वृत्तसंस्था)