जेएनयू दोन वर्षे बंद ठेवून तिथे ''स्वच्छता अभियान'' राबवा, सुब्रह्मण्यम स्वामींचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 11:51 AM2020-01-11T11:51:55+5:302020-01-11T11:59:03+5:30
जेएनयूला जोपर्यंत दोन वर्षांसाठी बंद केले जात नाही तोपर्यंत हे विद्यापीठ सुधरणार नाही.
अहमदाबाद - गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या आंदोलनांमुळे देशातील आघाडीच्या विद्यापीठांपैकी एक असलेले जेएनयू राजकीय केंद्र बनले आहे. जेएनयूमधील घडामोडींमुळे डाव्या आणि उजव्या विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्ष सध्या आमने-सामने आले असून, त्यामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण तापलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाचे ज्येष्ठ नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी जेएनयूमध्ये बीएसएफ आणि सीआरपीएफच्या जवानांची तैनाती करण्याची मागणी केली आहे. तसेच जेएनयू दोन वर्षांसाठी बंद करून तिथे स्वच्छता अभियान राबवावे त्यानंतर हे विद्यापीठ सुरू करावे, असा सल्लाही स्वामी यांनी सरकारला दिला आहे.
इंडस यूनिव्हर्सिटीच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सुब्रह्मण्यम स्वामी हे अहमदाबादमध्ये आले होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना स्वामी म्हणाले की, ''सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक कॅम्पसच्या आत पोलीस ठाणे बनवले गेले पाहिजे. आज काही घटना घडली की पोलिसांना बोलवावे लागते. त्याला खूप वेळ लागतो. देशातील विद्यापीठांमध्ये पोलीस ठाणे असणे आवश्यक आहे. ही तरतूद केवळ जेएनयूसाठी करू नये. मात्र याची सुरुवात जेएनयूपासून करण्यात यावी. अमेरिकेमध्ये प्रत्येक विद्यापीठात एक पोलीस ठाणे असते. जेएनयूसाठी केवळ दिल्ली पोलीसच नाही. तर तिथे बीएसएफ आणि सीआरपीएफचासुद्धआ एक कॅम्प असला पाहिजे. ''
जखमी झालेल्यांनीच हिंसाचार घडविला?, विद्यार्थी नेत्या आयशी घोषचाही समावेश
जखमी झालेल्यांनीच हिंसाचार घडविला?, विद्यार्थी नेत्या आयशी घोषचाही समावेश
'या' बॉलीवूड डायरेक्टरने भाजप नेते मुरली मनोहर जोशींना म्हटले, देशद्रोही
जेएनयू दोन वर्षांसाठी बंद करून तिथे स्वच्छता अभियान राबवले गेले पाहिजे, त्यानंतर हे विद्यापीठ पुन्हा सुरू करण्यात यावे, असा सल्लाही स्वामींनी दिला, '' जेएनयूला जोपर्यंत दोन वर्षांसाठी बंद केले जात नाही तोपर्यंत हे विद्यापीठ सुधरणार नाही. काँग्रेसच्या कार्यकाळात तिथे अशिक्षित आणि अयोग्य लोकांना मुद्दामहून प्रवेश दिला गेला आहे. जेएनयूमध्ये हॉस्टेलचे भाडे 10 रुपये आहे आणि तिथे 35 ते 40 या वयाचे विद्यार्थी आहेत, ते दरवर्षी नापास होत असतात. दिल्लीतील कॅम्पसमध्ये राहण्यासाठी एक जागा मिळावी आणि संपूर्ण देशभरात फिरून समाजवादी कार्यक्रमात सहभागी होता यावे, एवढीच येथील विद्यार्थ्यांचे धोरण असते,'' असे ते म्हणाले.
''जेएनयूमध्ये बहुतांश प्राध्यापक हे डाव्या विचारांचे आहेत. जे डाव्या विचारांचे नाहीत अशांना येथे येण्यापासून रोखण्यात येते.
अशाप्रकारच्या अनेक घटना घडूनही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. त्यामुळे या विद्यापीठाला दोन वर्षांसाठी बंद केले पाहिजे. तसेच येथील चांगल्या विद्यार्थ्यंना दिल्ली विद्यापीठ आणि आंबेडकर विद्यापीठात प्रवेश दिला पाहिजे. तसेच उरलेल्या लोकांना हटवून सफाई अभियान सुरू केले पाहिजे. त्यानंतर हे विद्यापीठ पुन्हा सुरू केले पाहिजे.''असा सल्ला स्वामी यांनी दिला. तसेच जेएनयूचे नामांतर करून नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यापीठ करावे अशी मागणीही त्यांनी केली.