राम मंदिराचे वचन पाळा; संघाचा भाजपाला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 05:43 AM2018-12-10T05:43:53+5:302018-12-10T06:57:55+5:30
आज देशाची सत्ता चालविणाऱ्यांनी अयोध्येत भव्य राम मंदिर बांधण्याचे देशाला वचन दिले होते, हे विसरू नये, असा टोला मारत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह सुरेश ‘भय्याजी’ जोशी यांनी राम मंदिरासाठी केंद्र सरकारने कायदा करणे हाच एकमेव पर्याय असल्याचे प्रतिपादन केले.
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : आज देशाची सत्ता चालविणाऱ्यांनी अयोध्येत भव्य राम मंदिर बांधण्याचे देशाला वचन दिले होते, हे विसरू नये, असा टोला मारत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह सुरेश ‘भय्याजी’ जोशी यांनी राम मंदिरासाठी केंद्र सरकारने कायदा करणे हाच एकमेव पर्याय असल्याचे प्रतिपादन रविवारी येथे केले.
रामलीला मैदानावर विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या ‘धर्मसंसदे’त बोलताना जोशी म्हणाले की, देशाला रामराज्याची आस लागली आहे. आमचा कोणत्याही समाजाशी झगडा नाही. आम्ही राम मंदिरासाठी याचना करतो आहोत, असेही नाही. आज सत्तेत बसलेल्यांनी राम मंदिर बांधण्याचे आश्वासन दिले होते. देशातील जनतेच्याही तशाच तीव्र भावना आहेत. त्यामुळे सरकारने जनभावनांचा आदर आणि दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, एवढेच आमचे म्हणणे आहे.
जोशींखेरीज विहिंपचे अध्यक्ष विष्णू सदाशिव कोकजे व त्यांचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांच्याखेरीज सर्वच वक्त्यांनी राम मंदिराची मागणी पूर्ण होईपर्यंत हे जनआंदोलन सुरूच ठेवण्याची ग्वाही दिली. गेल्या २५ नोव्हेंबरला विहिंपने अयोध्या, नागपूर व मंगळुरूसह देशात सात ठिकाणी अशाच धर्मसभांचे आयोजन केले होते. याच मालिकेतील शेवटची ‘धर्मसंसद’ ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी रोजी प्रयाग क्षेत्री व्हायची आहे.
दबावासाठी शक्तिप्रदर्शन
संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या दोन दिवस आधी विहिंपने राम मंदिरासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी हे शक्तिप्रदर्शन केले. आयोजकांनी पाच लाख लोक आल्याचा दावा केला असला तरी रामलीला मैदानावर पार्किंग हटविले तर जास्तीत जास्त लाखभर लोक मावू शकतात, ही वस्तुस्थिती आहे. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्याखेरीज वाहतुकीवरही निर्बंध घातले होते.