कर्जाचे हप्ते फेडताना या गोष्टी लक्षात ठेवा; अन्यथा कर्जाच्या सापळ्यात अडकण्याचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 11:24 AM2022-06-04T11:24:00+5:302022-06-04T11:24:39+5:30
तुम्ही कर्जाची परतफेड करण्यात अयशस्वी झाल्यास, त्याचा थेट तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो.
कर्ज घेण्यापूर्वी, तुम्ही तुमचा इतर खर्च आणि दर महिन्याचा ईएमआय किती असेल याचा अभ्यास करा. कर्जाची परतफेड करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला आर्थिक शिस्त असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही एकापेक्षा जास्त कर्ज घेतले असेल, तर त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. जाणून घेऊ...
तुम्ही कर्जाची परतफेड करण्यात अयशस्वी झाल्यास, त्याचा थेट तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो. जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त कर्ज असेल तर तुम्हाला याची विशेष काळजी घ्यावी लागेल.
आपल्याला आवश्यक तेवढे कर्ज घ्या
- सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा ईएमआय तुम्हाला परवडेल तितका असावा. त्यामुळेच गरज असेल तेवढेच कर्ज घ्या, अन्यथा कर्जाच्या सापळ्यात अडकू शकता.
- तुमच्या रोजच्या गरजा पूर्ण करताना ईएमआयमुळे अडचणी येणार नाहीत याची खात्री करा.
- शक्यतो, तुम्हाला मिळणाऱ्या उत्पन्नाच्या ४० टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम तुमच्या ईएमआयमध्ये जाणार नाही याची काळजी घ्या.
अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा
तुम्ही तुमच्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे, त्यामुळे तुमच्याकडे कर्ज फेडण्यासाठी पुरेसे पैसे जमा होतील. नेमका खर्च कशावर करायचा आहे त्याची यादी तयार करा आणि त्या वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य द्या. उदाहरणार्थ, तुम्ही वीज बिल, शाळेची फी यासारख्या खर्चांना प्राधान्य द्यावे. बजेटनुसार खर्चाची यादी बनवा आणि अनावश्यक खर्च टाळा. अशा प्रकारे तुम्ही दर महिन्याला खूप बचत करू शकता.
कर्जाचे हप्ते चुकवू नका
कर्जाची वेळेवर परतफेड न करण्याचा मोठा परिणाम म्हणजे तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होतो. त्यामुळे तुमच्याकडे अधिक कर्जे असल्यास, सर्व कर्जाचे ईएमआय वेळेवर भरा. सध्याचे कर्ज फेडण्यासाठी नवीन कर्ज घेणे टाळा, ते तुम्हाला कर्जाच्या सापळ्यात आणखी अडकवू शकते.