तीन शतकांचा ठेवा : प्रभादेवी मातेचे मंदिर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 08:16 AM2021-01-31T08:16:28+5:302021-01-31T08:17:16+5:30
मुंबई नगरीला ‘सोन्याची नगरी’ म्हटले जाते. पण, त्यापेक्षा तिला ‘मंदिरांची नगरी’ म्हणणेच अधिक सयुक्तिक ठरेल. मुंबई नगरीत जवळजवळ 481 पेक्षा अधिक मंदिरे आहेत. त्यापैकी सर्वात जास्त मंदिरे मारुतीची, त्याखालोखाल क्रमांक येतो शंकर मंदिरांचा तर देवींची मंदिरे ही पुरातन आहेत. यंदाचा प्रभादेवीचा जत्रोत्सव 6 फेब्रुवारीपर्यंत आहे. त्यानिमित्ताने...
- रवींद्र मालुसरे
तत्कालीन मुंबई बेटावरच्या रूढी व परंपरा बदलत्या काळासोबत अस्तंगत होत गेल्या आणि त्याच ओघात मुंबापुरीतील वार्षिक जत्राही काळाच्या पडद्याआड जाऊ लागल्या. सद्य:स्थितीत जेमतेम हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत जत्रा मुंबईत उरल्या आहेत. महालक्ष्मीची जत्रा, माहीमच्या मगदूम बाबाचा उरूस, माउंट मेरीची बांद्रा फेस्ट या आजही धूमधडाक्यात सुरू आहेत. त्यामानाने प्रभादेवीची जत्रा पारंपरिकतेची कास धरत जुन्या मुंबईचा ठेवा जपत असल्याचे दिसून येत आहे.
प्रभादेवीचे मंदिर आता जेथे पाहतो, ते हिचे मूळ ठिकाण नव्हे. श्री प्रभादेवीचे मूळ मंदिर होते मुंबईच्या माहीममध्ये. नेमके कुठे व कोणी बांधले याचा शोध घेताना, दोन वेगळ्या प्रकारची माहिती मिळते. पहिली माहिती मिळते ती ‘महिकावतीच्या बखरी’त. सदर बखर सन १४४८ ते सन १५७८ या दरम्यान लिहिली गेलेली असून, यातील एक घटना सन ११४० पासून चालुक्य कुळातला राजा प्रताप बिंबाच्या मुंबईतल्या आगमनापासून सुरू होते व सन १३४० च्या आसपास संपते. या दोनशे वर्षांच्या काळात मुंबईवर राज्य केलेल्या राजांचा इतिहास सांगणारी ही बखर आहे.
‘महिकावतीची बखर’ सांगते की, श्री प्रभावती ही मुंबईचा चालुक्य कुळाचा राजा प्रताप बिंबाची देवता. चालुक्यांची कुलदेवता श्री शाकंभरी, जिला प्रभावती असेही नाव आहे. त्याची कोकण प्रांतातली मूळ राजधानी केळवे-माहीम हातची गेल्यानंतर, सन ११४० च्या दरम्यान मुंबईतील माहीम येथे नवीन राजधानी केली. राजधानी स्थापन करताना आपली कुलदेवता श्री प्रभावती हिचे देऊळ स्थापन केले असावे, असे बखरीत कुठेही म्हटलेले नाही, मात्र असा तर्क केल्यास तो चुकीचा ठरणार नाही. कारण आताच्या श्री प्रभादेवीच्या मंदिरात तिच्या डाव्या-उजव्या हाताला असणाऱ्या श्री कालिका आणि श्री चंडिका देवींच्या मूर्ती..! श्री कालिका देवी ही राजा प्रताप बिंबाचे सरचिटणीस गंभीरराव सूर्यवंशी यांची कुलदेवता, तर श्री प्रभादेवीच्या डाव्या हाताला असलेली श्री चंडिका देवी, राजा प्रताप बिंबाचे पुरोहित असलेल्या हेमाडपंतांची कुलदेवता असल्याचा उल्लेख आहे. राजा प्रताप बिंबाने त्याच्या कुलदेवतेसोबत, त्याच्या या दोन अधिकाऱ्यांच्या कुलदेवतांना बरोबरीचे स्थान देऊन त्यांचा सन्मान केला असावा किंवा या कुलदेवता असलेल्या समाजाला आपल्या राज्यात बरोबरीचे स्थान आहे, असा संकेत दिला असावा, असे वाटण्यास जागा आहे. शिलाहारानंतर देवगिरीचे यादव मुंबई बेटावर आले. असे सांगतात की, यादव वंशाचा राजा बिंब उर्फ भीमदेव याने आपली राजधानी माहीम येथे स्थापन केली होती व त्याने आपल्यासमवेत काही लोक आणून तेथे वसाहत उभारली.
श्री प्रभादेवीच्या मंदिराच्या अनुषंगाने दुसरी माहिती मिळते, ती अशी की, मुंबई जेव्हा बेटांची बनली होती तेव्हा माहीम आणि वरळी बेटावरची मच्छीमार व पाठारे प्रभू समाजाची मंडळी या देवळात यायची. देवळावर मालकी कीर्तिकर कुटुंबाची, आजही त्याचे व्यवस्थापन या कुटुंबाकडे आहे. श्रीधर जोशी यांच्या कुटुंबाकडे पारंपरिक पौरोहित्य आहे. मंदिराच्या एका बाजूला नर्दुल्ला टँकजवळ तलाव होता, परंतु काळाच्या ओघात तो नष्ट होऊन तेथे मैदान व रवींद्र नाट्य मंदिर उभे राहिले. कृष्णराव रघुनाथजी नवलकर उपाख्य के. रघुनाथजी या पाठारे प्रभू समाजातील लेखकाने इसवी सन १८९०-९५ सालात लिहिलेल्या ‘The Hindu Temples of Bombay’ या पुस्तकात श्री प्रभादेवीचे मंदिर शके १२१७ (सन १२९५) मध्ये माहीममधील ‘कोटवाडी’ येथे उभारल्याचा उल्लेख केला आहे. या मंदिरात श्री प्रभादेवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सन १२९४-९५ मध्ये झाल्यावर पुढच्या दोनेकशे वर्षांच्या शांततेनंतर पंधराव्या शतकाच्या अखेरीस पोर्तुगीज भारतात आले. इ.स. १५३४ मध्ये त्यांनी गुजरातचा सुलतान बहादुरशहाला युद्धात नमवून वसई प्रांत, बेटे व सभोवतालचा समुद्र यांचा ताबा मिळवून पोर्तुगालचा राजा आणि त्याचे वारस यांचे या भागावर आधिपत्य प्रस्थापित केले. अशा रीतीने मुंबई बेटे ख्रिस्ती धर्मीयांच्या मालकीची झाली. पोर्तुगीज मिशनऱ्यांनी मूळ स्थानिकांचे धर्मांतर सुरू केले. ज्यांनी धर्मांतर करण्यास विरोध केला त्यांची मानहानी करून छळ सुरू केला. त्यांना गुलामासारखी वागणूक दिली. ख्रिस्ती धर्माधिकाऱ्यांनी स्थानिक मंदिरे व मूर्ती यांचा सूडबुद्धीने विध्वंसही केला. या वेळी बचावासाठी ही मूर्ती वांद्रे येथील एका विहिरीत लपवण्यात आली. पाठारे प्रभू समाजाच्या श्याम नायक यांना देवीने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की, मला विहिरीतून काढून माझी मंदिरात प्रतिष्ठापना कर. त्याप्रमाणे नायक यांनी इ.स. १७१४ मध्ये देवीची स्थापना करून १७१५ मध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण केले. पाठारे-प्रभूंची देवी म्हणून तिचे नामकरण प्रभावती असे करण्यात आले. म्हणजे इसवी सन १७१५ सालात आताच्या मंदिरात तिची प्रतिष्ठापना केलेली आहे. असा शिलालेख प्रभादेवीच्या मंदिरात पाहायला मिळतो. त्या मंदिराचे मूळ मालक कृष्णनाथ जयानंद कीर्तिकर. परधर्मीय आक्रमकांच्या याच मोहिमेत श्री प्रभादेवीचे मंदिर जमीनदोस्त करण्यात आल्याचा उल्लेख
के. रघुनाथजींच्या पुस्तकात आहे.
(लेखक मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई अध्यक्ष आहेत.)