पूजा बंद ठेऊन केरळमधल्या मंदिराने मुस्लिम युवकाला वाहिली श्रध्दांजली
By admin | Published: February 5, 2016 11:36 AM2016-02-05T11:36:46+5:302016-02-05T11:47:58+5:30
केरळमधल्या एका मंदिराने २३ वर्षीय मुस्लिम युवकाच्या मृत्यूबद्दल दोन दिवस मंदिरातील पूजा बंद ठेऊन दुखवटा व्यक्त केला.
Next
ऑनलाइन लोकमत
तिरुअनंतपूरम, दि. ५ - केरळमधल्या एका मंदिराने २३ वर्षीय मुस्लिम युवकाच्या मृत्यूबद्दल दोन दिवस मंदिरातील पूजा बंद ठेऊन दुखवटा व्यक्त केला. केरळमधल्या मंदिराने मुस्लिम युवकाला अशा प्रकारे श्रध्दांजली वाहण्याची ही दुर्मिळ घटना आहे. एम.व्ही.शब्बीर असे या युवकाचे नाव आहे. मागच्यावर्षी पूजेदरम्यान घडलेल्या एका घटनेवरुन रविवारी दुपारी चौघांनी शब्बीरला बेदम मारहाण केली होती. त्यात शब्बीरचा मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शीने या संपूर्ण मारहाणीचा व्हिडीओ चित्रीत केला होता.
यासंबंधी इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार तिरुअनंतपूरम जिल्ह्यात पुथेनाडा येथील शिव मंदिरात उत्सव आयोजित केला जातो. शब्बीर या उत्सव आयोजित करणा-या समितीचा सदस्य होता. सोमवारी आणि मंगळवारी मंदिराच्या विश्वस्तांनी शब्बीरच्या सन्मानार्थ शंख आणि घंटानाद न करण्याचा निर्णय घेतला.
या शिव मंदिरात दिवसाला पाच पूजा होतात. पण सोमवारी आणि मंगळवारी सकाळच्या दर्शनानंतर मंदिरात शंख आणि घंटानाद झाला नाही. ही धर्मापलीकडची मैत्री आहे. मंदिर समितीमध्ये असलेल्या शब्बीरला आम्ही कधीही मुस्लिम समजले नाही असे मंदिर महोत्सव समितीचे सदस्य असलेल्या एन.उन्नी यांनी सांगितले.