सत्ताकेंद्रे व परंपरांना आव्हान देत वाद-विवादाची परंपरा जिवंत ठेवा - रघुराम राजन यांचे आवाहन
By Admin | Published: October 31, 2015 04:13 PM2015-10-31T16:13:30+5:302015-10-31T16:13:30+5:30
देशाच्या प्रगतीसाठी सहिष्णूता अत्यावश्यक असल्याचे सांगतानाच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी सगळ्या सत्ताकेंद्रांना आणि परंपरांना आव्हान द्या असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला आहे
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ - देशाच्या प्रगतीसाठी सहिष्णूता अत्यावश्यक असल्याचे सांगतानाच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी सगळ्या सत्ताकेंद्रांना आणि परंपरांना आव्हान द्या असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला आहे. दिल्ली आयआयटीच्या पदवीप्रदान कार्यक्रमात बोलताना राजन यांनी वाद विवादाची परंपरा, परस्परांविषयी आदर आणि सहिष्णूता या गोष्टी कल्पनांचा कारखाना खुला ठेवण्यासाठी आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
प्रगत अशा औद्योगिक जगाच्या पद्धतींचं नीट अवलोकन केलं तरी भारताची वाढ चांगली होईल असं सांगताना जे सॉफ्टवेअर क्षेत्रानं केलं तसं उत्पादन क्षेत्रानं करायला हवं असंही मत व्यक्त केलं.
नव्या कल्पना, उत्पादनाच्या नव्या पद्धती आणि चांगली दळणवळण यंत्रणा या टिकाऊ आर्थिक वृद्धीसाठी आवश्क असल्याचे ते म्हणाले.
वाद विवाद आणि विचारांची देवाणघेवाण याबाबत बोलताना राजन यांनी सगळ्या आदर्शवादांची चिकित्सा व्हायला हवी असे सांगत असे विचार भारतीय आहेत की विदेशी याची तमा बाळगता कामा नये असेही सांगितले. असे विचार हजार वर्षांपूर्वी जन्माला आले की काही सेकंदापूर्वी, ते एखाद्या अशिक्षिताकडून आले की जागतिक दर्जाच्या प्राध्यापकाकडून याचा विचार न करता चिकित्सा व्हायला हवी, वाद विवाद व्हायला हवे अशी अपेक्षा राजन यांनी व्यक्त केली.