केसरकर-राणे आज आमने-सामने

By admin | Published: October 14, 2016 12:59 AM2016-10-14T00:59:39+5:302016-10-14T01:13:22+5:30

नियोजन समितीची बैठक : संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

Kejarkar-Rane today face-to-face | केसरकर-राणे आज आमने-सामने

केसरकर-राणे आज आमने-सामने

Next

सिंधुुदुर्गनगरी : जिल्हा नियोजन समितीची बैठक आज, शुक्रवारी होत असून, त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर व माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार नारायण राणे आमने-सामने येत असल्याने या बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जिल्हा नियोजन समितीची बैठक दुपारी ३ वा. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली नवीन सभागृहात होणार आहे. या बैठकीला अडीच वर्षांनंतर विधान परिषदेतील आमदार नारायण राणे उपस्थित राहणार आहेत. बैठकीत विविध विकासकामांच्या मुद्द्यावरून केसरकर व राणे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. म्हणूनच या बैठकीला महत्त्व आहे.
जिल्हा नियोजन समितीची यापूर्वीची सभा २१ जानेवारीला केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. या सभेतही वादळी चर्चा झाली होती. त्यामुळे पालकमंत्र्यांनी काही सदस्यांना तात्पुरत्या कालावधीसाठी निलंबित केले होते. त्या गदारोळातच सभेचे कामकाज आटोपण्यात आले होते. जानेवारीत सभा झाल्यानंतर नियमानुसार त्यानंतरची सभा तीन किंवा सहा महिन्यांनंतर घेणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात या सभेला नऊ महिन्यांनंतर मुहूर्त मिळाला आहे.
शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत १३० कोटी रुपयांच्या जमाखर्चांचा आढावा, जुन्या कामांना मंजुरी देणे, कामांचे पुनर्नियोजन करणे, आदी विषय चर्चेला येणार आहेत. विषयपत्रिकेत जुन्या कामांना मंजुरी देणे हा विषय कळीचा मुद्दा ठरू शकतो. कारण जानेवारीमध्ये पार पडलेल्या बैठकीत गदारोळातच काही कामे सुचविण्यात आली होती. त्या कामांना या बैठकीमध्ये सर्व सदस्यांची मंजुरी घ्यावी लागणार आहे. तरच त्या कामांना मान्यता मिळणार आहे. (प्रतिनिधी)


केसरकर यांच्या ‘त्या’
उद्गाराची होणार आठवण
राणे ज्यावेळी पालकमंत्री होते, त्यावेळी त्यांच्यात व केसरकर यांच्यात शाब्दिक वादही व्हायचे. त्यावेळी ‘मी ही एक दिवस पालकमंत्री असेन’, असे उद्गार केसरकर यांनी तत्कालीन नियोजन सभेत काढले होते. त्यामुळे या बैठकीला नारायण राणे उपस्थित राहिल्यास केसरकर यांनी काढलेल्या त्या उद्गाराची निश्चितच आठवण येणार आहे. विकासकामांवरून राणे पालकमंत्र्यांवर कडाडून टीका करीत आहेत.

Web Title: Kejarkar-Rane today face-to-face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.