दिल्लीला गॅस चेंबर होण्यापासून वाचवा, शेजारच्या राज्यांना केजरीवालांनी केलं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 09:47 AM2019-10-30T09:47:24+5:302019-10-30T09:57:27+5:30
दिल्लीतील प्रदुषणात वाढ झाली असून हवेची गुणवत्ता ही आणखी खालावली आहे.
नवी दिल्ली - पंजाब आणि हरयाण सरकारने प्रदुषणाविरोधात कडक पावलं उचलण्याचं आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे. मंगळवारी (29 ऑक्टोबर) केजरीवाल यांनी प्रदुषणावर नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकार प्रयत्नरत असल्याचे ट्विट देखील केले आहे. दिल्लीतील प्रदुषणात वाढ झाली असून हवेची गुणवत्ता ही आणखी खालावली आहे. दिवाळीत फटाके फोडल्यामुळे प्रदुषणात वाढ झाली असून श्वास घेणं ही लोकांसाठी कठीण झालं आहे.
प्रदुषणासंबंधी एका ट्विटर युजरने शेअर केलेली पोस्ट रिट्विट करून केजरीवाल यांनी हे आवाहन केले आहे. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी, तसेच सोमवारी आणि मंगळवारीही शहरात गॅस चेंबर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागात रविवारी रात्रीपासूनच हवेची गुणवत्ता खालावली होती. शुद्ध हवेची गुणवत्ता ही 60 च्या घरात असते. अशातच हरयाणा आणि पंजाबमध्ये जाळण्यात येणाऱ्या पराळीमुळे प्रदुषणात वाढ होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीत प्रदूषणकारी फटाके वाजवण्यावर बंदी घातली होती व हरित म्हणजे पर्यावरणपूरक फटाके वाजवण्याचा आदेश दिला होता. मात्र तरीही दिल्लीमध्ये प्रदूषण करणारे फटाके हे अनेक ठिकाणी फोडण्यात आले. त्यामुळे हवेची गुणवत्ता ही आणखी खालावली आहे.
दिल्ली वसियों की ओर से मेरी पंजाब हरियाणा की सरकारों से हाथ जोड़ कर अपील है कि तुरंत कुछ ठोस क़दम उठायें और दिल्ली को गैस चेम्बर बनने से बचायें।
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) October 29, 2019
हमारे स्तर पर हम हर सम्भव प्रयास कर रहे हैं और करते रहेंगे। https://t.co/Tlylgzo334
दिल्लीतील वायू गुणवत्ता निर्देशांक हा सोमवारी सकाळी (28 ऑक्टोबर) 2.5 चा स्तर 500 (पीएम) राहिला. वायू गुणवत्ता निर्देशांकांमध्ये 300 पेक्षा अधिक परिमाण खूप खराब मानले जाते. मालवीय नगर, लाजपत नगर, कैलाश हिल्स, बुराड़ी, जंगपुरा, शाहदरा, लक्ष्मी नगर, मयूर विहार, सरिता विहार, हरी नगर, न्यू फ्रेंड्स कॉलोनी, द्वारका आणि इतरही काही ठिकाणी फटाके फोडण्यात आले. त्यानंतर वायू प्रदुषणात वाढ झालेली दिसून आली आहे. केंद्र सरकारच्या वायू गुणवत्ता व हवामान अंदाज प्रणाली व अनुसंधान (सफर) या संस्थेने हवेची गुणवत्ता खराब होण्यासाठी हवामानामध्ये होणारे बदल कारणीभूत असल्याचा दावा केला आहे. दिल्लीच्या वातावरणात शेजारच्या राज्यांमध्ये पेंड्या जाळल्यामुळे प्रदुषणात 10 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
दिल्लीजवळील राज्यांमध्ये शेतकऱ्यांकडून पराली जाळली जात असल्याने दिल्लीतील हवेची गुणवत्ता बिघडली असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले होते. पंजाब, हरयाणातील पराली जाळली जात असल्यामुळे दिल्ली-एनसीआरमधील हवेच्या गुणवत्तेवर होणाऱ्या परिणामांबाबत चर्चा करण्यासाठी 10 सदस्यीय समितीने कृती आराखडा तयार केला आहे. राजधानीतील हवा काही प्रदूषित झाली आहे. प्रदूषित हवेच्या त्रास नागरिकांना बसू नये यासाठी भाजपाचे खासदार मनोज तिवारी यांनी कॅनॉट प्लेस परिसरात दिल्लीकरांना मास्क वाटले होते.