सच्चा हिंदू मैदान सोडून पळत नाही; केजरीवालांचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 03:52 PM2020-02-06T15:52:05+5:302020-02-06T16:25:57+5:30
भाजप आधी मत मागत असून नंतर मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार स्पष्ट करणार आहे. अशा स्थितीत संबित पात्रा यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार भाजपने करावा, असंही केजरीवाल यांनी नमूद केले.
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर कडाडून टीका केली आहे. आपण अमित शाह यांना दिल्लीच्या प्रत्येक मुद्दावर चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले होते. परंतु, शाह यांच्याकडून काहीही प्रतिसादन आला नसल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
जनतेत जाण्यासाठी अमित शाह तयार नाहीत. जनतेच्या प्रश्नाचे उत्तर त्यांना द्यायचे नाहीत. हे त्रासदायक आहे. गीतेत लिहिलेले आहे की, मैदान सोडून कधीही पळू नका. एक खरा हिंदू शूर असतो. मैदान सोडून पळत नाही. अमित शाह यांनी असं मैदान सोडून पळणे योग्य वाटत नाही. ते जनतेच्या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी मैदान सोडून पळत असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
आम आदमी पक्षाच्या कार्यालयात केजरीवाल यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केवळ शाह यांनाच नव्हे तर संपूर्ण भाजपला लक्ष्य केले. भाजपचं हिंदुत्व खोटारड आहे. यावेळी त्यांना विचारण्यात आले की, तुम्हाला हनुमान चालीसा म्हणावी लागत आहे. त्यावर ते म्हणाले की, आपण भाजपच्या सर्व नेत्यांकडून हनुमान चालीसा म्हणून घेणार आहोत.
दरम्यान केजरीवाल यांनी अमित शाह यांना दोन दिवसांपूर्वीच दिल्लीच्या मुद्दांवर चर्चा करण्यासाठी आव्हान दिले होते. त्याला शाह यांनी काहीही प्रतिसाद दिला नव्हता. त्यातच भाजप आधी मत मागत असून नंतर मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार स्पष्ट करणार आहे. अशा स्थितीत संबित पात्रा यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार भाजपने करावा, असंही केजरीवाल यांनी नमूद केले.