रोड शोमुळे वेळेवर पोहोचू शकले नाहीत केजरीवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 05:40 AM2020-01-21T05:40:21+5:302020-01-21T05:41:59+5:30
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उशीर झाल्याने नवी दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही.
नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उशीर झाल्याने नवी दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही.
मुख्यमंत्री यांना ‘आप’ने नवी दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली आहे. यासाठी ते सकाळी घरून निघाले. घरी त्यांनी आई-वडिलांचा आशीर्वाद घेतला. वाल्मीकी मंदिरात पूजा करून त्यांचा रोड शो सुरू झाला. रोड शो मध्ये आपच्या कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती. ‘अच्छे बिते पाच साल, लगे रहो केजरीवाल’ या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. केजरीवाल यांच्यासोबत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, आपच्या नेत्या आतिशी व इतर नेतेही रोड शोमध्ये सामील झाले होते. केजरीवाल यांचे कुटुंबीयसुद्धा या रोड शोमध्ये होते. कार्यकर्त्यांच्या डोक्यावर आपच्या टोप्या होत्या.
आपच्या कार्यकर्त्यांची गर्दी बरीच वाढल्याने मुख्यमंत्री केजरीवाल उमेदवारी अर्ज भरायला वेळेमध्ये पोहोचू शकले नाही. उमेदवारी दाखल करण्यासाठी दुपारी ३ वाजेपर्यंतची वेळ होती; परंतु मुख्यमंत्री केजरीवाल जिल्हाधिकारी कार्यालयात उशिरा पोहोचल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास नकार दिला. यामुळे आता मुख्यमंत्री केजरीवाल यांना उद्या, (मंगळवार) अर्ज दाखल करावा लागणार आहे.
कार्यकर्त्यांची गर्दी वाढल्याने उशीर झाला. या कार्यकर्त्यांना सोडून उमेदवारी अर्ज दाखल करणे योग्य नव्हते. यामुळे सोमवारी उमेदवारी अर्ज भरता आला नाही.
-अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली.