मोदी पतंगांचा बोलबाला केजरीवालांना भाव नाही
By admin | Published: August 9, 2015 10:18 PM2015-08-09T22:18:39+5:302015-08-09T22:18:39+5:30
देशाच्या विविध भागांत स्वातंत्र्यदिनी पतंग उडविण्याची परंपरा आहे. यावेळी मोदी-ओबामा मैत्रीची साक्ष देणाऱ्या पतंगांचा बोलबाला आहे. या दोन्ही नेत्यांचे चित्र
नवी दिल्ली : देशाच्या विविध भागांत स्वातंत्र्यदिनी पतंग उडविण्याची परंपरा आहे. यावेळी मोदी-ओबामा मैत्रीची साक्ष देणाऱ्या पतंगांचा बोलबाला आहे. या दोन्ही नेत्यांचे चित्र असलेले पतंग दिल्लीचे आकाश व्यापू लागले आहेत. विविध आकाराच्या-रंगांच्या मोदी-ओबामा पतंगांना अधिक मागणी आहे. नेहमीप्रमाणे सलमान, शाहरुख, अमिताभ, करिनासह काही टीव्ही कलाकारांची चित्रे असलेले पतंगही उडविले जातात; मात्र दिल्लीतील जनता खट्टू असल्यामुळे की काय, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे चित्र असलेले पतंग गायब आहेत. अद्यापपर्यंत केजरीवाल पतंग बाजारात आलेले नाहीत. बाजारात मोदींच्या दोन प्रकारच्या पतंग दिसून येतात. त्यांचा एकमेव फोटो असलेल्या पतंगावर ‘महानायक’ आणि काठाला ‘अच्छे दिन’ असे लिहिलेले आढळते. मोदी-ओबामांच्या मैत्रीची साक्ष देणारे एकत्र फोटो असलेले दुसरे पतंगही दिसून येते आहे, असे पतंग विक्रेत्यांनी सांगितले. जुन्या दिल्लीतील लालकुआँ भागात दरवर्षी पतंगाचे व्यापारी दुकान मांडून बसतात. यावेळी राजकीय नेते आणि कलाकारांसोबतच कार्टून असलेले पतंग लक्ष वेधून घेतात. दिल्लीत आबालवृद्ध दिवसभर पतंग उडवून स्वातंत्र दिन साजरा करतात. (लोकमत न्यूज नेटवर्क)