केजरीवालांनी केली असीम अहमद यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी
By admin | Published: October 9, 2015 04:47 PM2015-10-09T16:47:34+5:302015-10-09T16:58:55+5:30
भ्रष्टाचाराचे आरोप झालेले दिल्लीचे खाद्य मंत्री असीम अहमद यांची मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना लाइव्ह हकालपट्टी केली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - भ्रष्टाचाराचे आरोप झालेले दिल्लीचे खाद्य मंत्री असीम अहमद यांची मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना लाइव्ह हकालपट्टी केली आहे. आम्ही खान यांच्यावरील आरोपांची अंतर्गत चौकशी केली नी हे पाऊल उचलल्याचे सांगताना केजरीवाल यांनी आता भाजपाने वसुंधरा राजे शिंदे, शिवराजसिंग चौहान यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली.
इम्रान हुसेन यांची अहमद यांच्याजागी नियुक्ती करण्यात आली आहे. केजरीवाल यांच्या या कृतीवर विविध प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटल्या आहेत. भ्रष्टाचार कुठल्याही स्वरुपात सहन न करण्याचे आमचे धोरण असून, खुद्द माझा मुलगा गैरप्रकार करताना आढळला तर त्याच्याही बाबतीत हाच निकष लावण्यात येईल असे केजरीवाल म्हणाले.
मात्र, केजरीवाल यांच्या या कृतीचे विरोधकांनी फारसे उत्साहात स्वागत केलेले नाही. ४८ दिवसांत लोकपाल आणतो सांगणा-या केजरीवालांनी २०० दिवस होऊन गेले तरी लोकपालाची नियुक्ती का केली नाही असा प्रश्न विचारणा-या काँग्रेसने जर, लोकपाल पदावर असते तर केजरीवालांचे अर्ध्याहून जास्त मंत्रिमंडळ निलंबित झाले असते अशी बोचरी टीका काँग्रेसने केली आहे. तर, आम आदमी पार्टीच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, मग त्यांना कधी हाकलणार असा सवाल भाजपाच्या एका नेत्याने विचारला आहे.