केजरीवालांनी दिल्लीला 'लालू मॉडेल' दिलं, मजुरांचे हजारो कोटी खाल्ले - अनुराग ठाकूर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 06:46 PM2022-12-03T18:46:58+5:302022-12-03T18:47:12+5:30
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर सडकून टीका केली.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर सडकून टीका केली. “अरविंद केजरीवाल यांनी कोणता वर्ग सोडला आहे? भ्रष्टाचाराचं नवीन मॉडेल आणि भ्रष्टाचार हा 'आप'चा शिष्टाचार बनला असल्याचे ठाकूर म्हणाले. ते म्हणाले, “केजरीवाल यांनी लालूंचे मॉडेल दिल्लीला दिले आहे. इथे एक नाही तर अनेक घोटाळे झालेले सरकार आहे. त्यांनी मजुरांचे हक्क हलाल केले आणि हजारो कोटी खाल्ले.”
एका मजुराच्या नावावर २५ जणांना काम देण्यात आले तर एका मोबाईल क्रमांकावर ६ अर्ज भरण्यात आले. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मित्रांनी कामगार कल्याण मंडळाच्या नावावर जमा केलेले हजारो कोटी रुपये लुटले आणि खाल्ल्याचा आरोप ठाकूर यांनी यावेळी केला. “हे दिल्लीचे लालू मॉडेल आहे. जितके आकडे समोर येतात त्यावरून माहिती मिळतेय की बनावट पत्ते, मोबाईल नंबर, नावं मिळाली आहेत. हा पैसा कोणाच्या खिशात गेला. जर मजूर, काम देणारे, त्यांचे पत्ते आणि मोबाईल नंबर बनावट होते तर पैसे केजरीवालांनी खाल्ले का?” असा सवालही त्यांनी केला.
अधिकारांपासून वंचित ठेवलं
आप सरकार मद्य, शिक्षण, डीटीसी बस घोटाळ्यात गुंतले आहे आणि मजुरांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवत आहे. अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराचे नवे मॉडेल आणले. दिल्लीत केजरीवाल लालू प्रसाद यादव यांच्या 'लूट' मॉडेलला अनुसरत असल्याचेही ठाकूर म्हणाले.
कोरोनाच्या काळात एकीकडे केजरीवाल मजुरांना मदत करण्याचे बोलत राहिले आणि दुसरीकडे मजुरांना कट रचून पळवण्याचे काम केले. ज्या मजुरांना दोन पैसे कमावण्यासाठी मोठी कसरत करावी लागते त्यांच्या हक्काची भाकरी खाण्यातही ते मागे राहिले नाही, असेही त्यांनी नमूद केले.