केजरीवाल सरकार संकटात? भाजप आमदारांचे 'ते' पत्र राष्ट्रपतींनी पाठवले गृह मंत्रालयालाकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 02:00 PM2024-09-10T14:00:29+5:302024-09-10T14:01:01+5:30
AAP BJP Delhi Politics : सध्या तुरुंगात असलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे दिल्लीतील सरकार संकटात येण्याची शक्यता आहे. अलिकडेच भाजपच्या आमदारांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन एक पत्र दिले. हे पत्र राष्ट्रपतींनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवले आहे.
Kejriwal Government : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आप सरकार जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्याला कारण ठरले आहे, भाजप नेत्यांनी राष्ट्रपतींची घेतलेली भेट! दिल्लीतील सरकार बरखास्त करण्याची मागणी आमदारांनी राष्ट्रपतींकडे केली. ते पत्र आता राष्ट्रपती भवनाने केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या गृह मंत्रालयाकडे पाठवले आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे तुरुंगात असून, दिल्लीतील सरकारच्या कारभाराबद्दल भाजप आमदारांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. दिल्लीतील सरकार बरखास्त करण्याची मागणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन केली. तसे पत्र भाजप आमदारांनी राष्ट्रपतींना दिले.
ते पत्र राष्ट्रपतींनी पाठवले गृह मंत्रालयाकडे
दिल्लीतील केजरीवाल सरकार बरखास्त करण्याची मागणी करणारे भाजप आमदारांच्या पत्राची राष्ट्रपती भवनाकडून दखल घेण्यात आली आहे. राष्ट्रपती भवन सचिवालयाने हे पत्र केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवले आहे. केंद्रीय गृह सचिवांना पत्र पाठवण्यात आल्याचे राष्ट्रपती भवन सचिवालयाचे संचालक शिवेंद्र चतुर्वेदी यांनी कळवले आहे.
दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागणार?
केजरीवाल सरकार बरखास्त करण्याची मागणी करणारे पत्र गृह मंत्रालयाकडे पाठवण्यात आल्याच्या माहितीनंतर दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागण्याच्या चर्चेने डोके वर काढले आहे. सरकारचे प्रमुख असलेले अरविंद केजरीवालच तुरुंगात असल्याचा मुद्दा भाजप आमदारांकडून मांडण्यात आलेला आहे.
भाजप आमदारांनी ऑगस्टमध्ये घेतली होती राष्ट्रपतीची भेट
गेल्या महिन्यात ३० ऑगस्ट रोजी भाजप आमदारांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली होती. त्यावेळी भाजप आमदारांनी राष्ट्रवादींना पत्र दिले होते. आमदार विजेंद्र गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ही मागणी केली.
दिल्ली में संवैधानिक संकट: विपक्षी नेताओं की मांग पर राष्ट्रपति सचिवालय ने लिया संज्ञान, गृह मंत्रालय को भेजा पत्र - Constitutional crisis in Delhi https://t.co/lBb6RNNjDV
— Vijender Gupta (@Gupta_vijender) September 9, 2024
"मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगामध्ये आहेत. त्यामुळे सरकार करू शकत नाहीये. पावसामुळे दिल्लीत पाणी तुंबत आहे. आयुष्मान भारत योजना दिल्लीत लागू झालेली नाही. हजारो कोटींचा निधी येणे बंद झाला आहे. त्यामुळे आम्ही राष्ट्रपतींकडे दिल्लीतील सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे", विजेंद्र गुप्ता म्हणाले.