आमदार अपात्र ठरल्यास केजरीवालच दोषी
By admin | Published: September 11, 2016 07:00 AM2016-09-11T07:00:10+5:302016-09-11T07:00:10+5:30
विधिमंडळ सचिवपदी नियुक्त केलेल्या २१ पक्ष आमदारांना अपात्र ठरविण्यात आल्यास, त्याला तुम्हीच जबाबदार असाल
नवी दिल्ली : विधिमंडळ सचिवपदी नियुक्त केलेल्या २१ पक्ष आमदारांना अपात्र ठरविण्यात आल्यास, त्याला तुम्हीच जबाबदार असाल, असे पत्र आम आदमी पार्टीचे बंडखोर आमदार देवेंद्र सेहरावत यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाठविले आहे.
सेहरावत यांच्या पत्राने पक्षात सर्वकाही आलबेल नसल्याचे पुन्हा दिसून आले. मंत्र्यांवर बलात्कारासारखे आरोप झाल्यामुळे पक्ष अडचणीत असताना सहरावत यांनी केजरीवालांवर लेटर बॉम्ब टाकल्याने खळबळ उडाली आहे. केजरीवाल यांनी आशिष तलवारसारख्या सल्लागाराचे ऐकून पक्षाच्या आमदारांची विधीमंडळ सचिवपदी नियुक्ती केली. लाभाची दोन पदे भुषविता येत नाहीत याची आपच्या नवख्या आमदारांना कल्पना नव्हती. आपच्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. हे तुमच्यामुळेच घडले आहे, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
पक्षाच्या पंजाब शाखेच्या नेत्यांनी उमेदवारीसाठी महिलांचे शोषण केल्याचा आरोप सेहरावत यांनी केला होता. त्यानंतर आपच्या पंजाब प्रदेश शाखेने त्यांच्यावर अबु्रनुकसानीचा दावा केला होता. तेव्हापासून सहरावत पक्षाच्या
वरिष्ठ नेत्यांवर टीका करीत आहेत. आप सरकारने २१ आमदारांची विधीमंडळ सचिव म्हणून केलेली नियुक्ती उच्च न्यायालयाने आठ सप्टेंबर रोजी बेकायदा ठरविली
होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)