9 दिवसांच्या आंदोलनानंतर केजरीवाल 10 दिवसांसाठी बंगळुरुला रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2018 02:00 PM2018-06-22T14:00:06+5:302018-06-22T14:04:42+5:30
केजरीवाल यांनी काल योग दिनासाठी आयोजित केलेल्या राज पथावरील कार्यक्रमात सहभाग घेतला नाही. बुधवारी ते उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आयोजित केलेल्या ईद मिलन कार्यक्रमात सहभागी झाले होते.
नवी दिल्ली- राज्यपालांच्या घरामध्ये 9 दिवस मुक्काम ठोकणाऱ्या दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी 1 दिवस कामकाज पाहून काल बंगळुरुच्या दिशेने प्रस्थान केले. आता बंगळुरुमध्ये ते 10 दिवस नॅचरोपॅथीचे उपचार घेणार आहेत.
दिल्लीमधील आयएएस अधिकारी संपावर आहेत असा दावा करुन आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री आपल्या उपमुख्यमंत्री व मंत्र्यांसह राज्यपाल अनिल बैजल यांच्या घरामध्ये आंदोलनासाठी 9 दिवस तळ ठोकून बसले. दोन दिवसांपुर्वी त्यांनी आंदोलन गुंडाळल्यानंतर त्यांच्या मनमानी कारभारावर सर्वबाजूंनी टीका झाली. आयएएस अधिकारी कोणत्याही संपावर वगैरे नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्यामुळे केजरीवाल यांच्या भूमिकेबद्दल चिन्ह निर्माण झाले होतेच. आता आंदोलन संपवल्यानंतर केवळ 3 बैठका घेऊन अरविंद केजरीवाल बंगळुरुला गेले आहेत. तेथे ते 10 दिवसांचे निसर्गोपचार घेणार आहेत. गुरुवारी त्यांनी एक कॅबिनेट सदस्यांबरोबर बैठक घेतली, दुसरी बैठक ऊर्जा मंडळाबरोबर व तिसरी बैठक जल बोर्डाबरोबर घेतली. त्यातील दोन बैठकांमध्ये अनेक सनदी अधिकारी उपस्थित होते.
कॅबिनेट मीटिंगमध्ये आठ सरकारी रुग्णालये आणि संस्थांचे केंद्रीय एजन्सीमार्फत ऑडिट करण्याच्या निर्णयाला त्यांनी मान्यता दिली. यामध्ये राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जनकपुरी सुपर स्पेशल हॉस्पिटल, दिल्ली स्टेट कॅन्सर इन्स्टीट्यूट, इन्स्टीट्यूट ऑफ लिव्हर अँड बायलरी सायन्सेस, चाचा नेहरु बाल चिकित्सालय, चौधरी ब्रह्मप्रकाश आयुर्वेद चरक संस्थान, मौलाना आझाद इन्स्टीट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस अँड इन्स्टीट्यूट ऑफ ह्युमन बिहेवियर अँड अलाईड सायन्सेस यांचा समावेश आहे.
बवाना येथे सांडपाणी प्रक्रीया केंद्राबद्दलही त्यांनी निर्णय घेतला. येथे पीपीपी तत्त्वावर एक बांधा वापरा आणि हस्तांतरित करा पद्धतीने 25 वर्षांचे कंत्राट देऊन प्रकल्प उभारला जाईल. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले, त्यांनी केलेल्या धरणे आंदोलनामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला. केजरीवाल एका लहानशा वेटिंग रुममध्ये नऊ दिवस राहिले. तेथे झोपण्यासाठी केवळ एक लहानसा सोफा होता तसेच कोणत्याही सोयी नव्हत्या. मधुमेहाचा त्रास असल्यामुळे त्यांच्या रक्तातील शर्करा या काळात वाढली आणि त्याचा त्यांना त्रास होत आहे.
बैठका झाल्यावर केजरीवाल 10 दिवसांच्या नॅचरोपॅथीच्या उपचारांसाठी बंगळुरुला गेले आहेत. केजरीवाल यांनी काल योग दिनासाठी आयोजित केलेल्या राज पथावरील कार्यक्रमात सहभाग घेतला नाही. बुधवारी ते उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आयोजित केलेल्या ईद मिलन कार्यक्रमात सहभागी झाले होते.