केजरीवाल जामिनावर मुक्त, निवडणुकीच्या शेवटच्या चार टप्प्यांमध्ये करणार प्रचार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 06:19 AM2024-05-11T06:19:28+5:302024-05-11T06:19:52+5:30
५१ दिवस काढले ‘ईडी’च्या काेठडीत, २ जून राेजी तुरुंगात परतावे लागणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या चार टप्प्यांमध्ये प्रचार करण्यासाठी आज सर्वोच्च न्यायालयाने आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला. २ जून रोजी त्यांना पुन्हा तिहार तुरुंगात परतावे लागणार आहे.
ईडीने केलेल्या अटकेला आणि ईडीच्या कोठडीला आव्हान देणाऱ्या केजरीवाल यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला. बुधवारी अपूर्ण राहिलेली सुनावणी आज सुरु होताच ईडीचा कोणताही युक्तिवाद ऐकून न घेता सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामिनाचा आदेश दिला. दिल्ली मद्य धोरण प्रकरणी केजरीवाल यांना मार्च २०२४ मध्ये अटक झाली हाेती. प्रचार करण्याचा मौलिक, घटनात्मक किंवा कायदेशीर अधिकार नसल्याने केजरीवाल यांना अंतरिम जामीन देता येणार नाही, हा ईडीचा दावा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला.
काम करण्यावर निर्बंध
केजरीवाल यांच्या प्रचार करण्यावर कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत. मात्र, उपराज्यपालांच्या संमतीशिवाय ते फायलींवर स्वाक्षरी करणार नाहीत, मुख्यमंत्री कार्यालयात जाणार नाहीत आणि मंत्रिमंडळाच्या बैठकींमध्ये भाग घेऊ शकणार नाहीत.