केजरीवाल म्हणतात, निवडणूक आयोग धृतराष्ट्र तर भाजपा दुर्योधन
By admin | Published: April 10, 2017 08:10 PM2017-04-10T20:10:24+5:302017-04-10T20:10:24+5:30
मतदान यंत्रातील फेरफाराच्या मुद्याला पुन्हा हात घालताना केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाची तुलना धृतराष्ट्राशी तर भाजपाची तुलना दुर्योधनाशी
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - आप आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंदी केजरीवाल यांनी मतदान यंत्रांवरून निवडणूक आयोग आणि भाजपावर टीका करणे सुरूच ठेवले आहे. मतदान यंत्रातील फेरफाराच्या मुद्याला पुन्हा हात घालताना केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाची तुलना धृतराष्ट्राशी तर भाजपाची तुलना दुर्योधनाशी केली आहे.
निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा गंभीर आरोप करताना केजरीवाल म्हणाले की, "निवडणूक आयोगाने काहीही करून भाजपाला निवडणून देण्याचा विडा चलला आहे. मतदान यंत्रात गडबड असल्याची नवनवी प्रकरणे समोर येत आहेत. पण त्याची चौकशी न करता निवडणूक आयोगाकडून शंकांना जन्म दिला जात आहे." गेल्या काही काळापासून केजरीवाल मतदान यंत्रात फेरफार झाल्याचा आरोप सातत्याने करत आहेत. पण निवडणूक आयोगाने मतदान यंत्रात फेरफार होणे शक्य नसल्याचे सांगून केजरीवाल यांचे आरोप सातत्याने फेटाळून लावले आहेत.
एमसीडी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज केजरीवाल यांनी एका पत्रकार परिषदेला संबोधिक केले. त्यावेळी केजरीवाल यांनी मतदान यंत्रात गडबड झाल्याच्या आरोपांचा पुनरुच्चार केला. निवडणूक आयोग धृतराष्ट्र बनला आहे आणि साम, दाम, दंड, भेद वापरून आपला पुत्र असलेल्या भाजपाला कोणत्याही किमतीवरी विजयी करण्यासाठी प्रयत्नशील आहे.काल देशभरात पोटनिवडणुका झाल्या. त्यात राजस्थानमधील धौलपूरमध्ये 18 मतदान यंत्रात फेरफार झाल्याचे दिसून आले. इव्हीएमच्या प्रोग्रॅंमिंगमध्ये गडबड झाली आहे. मशिनीचे कोड बदलले. कुणी, कधी आणि का बदलले याबाबत शंका येत आहे."
मतदारयंत्रातील फेरफारावरून गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोगावर चौफेर आरोप करत असलेल्या अरविंद केजरीवाल यांचे आव्हान निवडणूक आयोगाने स्वीकारले होते. केजरीवाल यांनी मतदान यंत्रात फेरफार झाल्याचे सिद्ध करून दाखवावेच, असे प्रतिआव्हान निवडणूक आयोगाने दिले होते.