दोन दिवसांत केजरीवाल सोडणार मुख्यमंत्रिपद; नवी खेळी : म्हणाले, जनतेने प्रमाणपत्र दिल्यावरच पदावर परतणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 05:11 AM2024-09-16T05:11:31+5:302024-09-16T05:12:29+5:30
दिल्लीत महाराष्ट्रासाेबतच निवडणुकीची मागणी
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपण दोन दिवसांनी राजीनामा देत असल्याची घोषणा करून रविवारी दिल्लीकरांसह राजकीय क्षेत्रातील धुरिणांना आश्चर्याचा धक्का दिला. ‘दोन दिवसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईन आणि दिल्लीत मुदतपूर्व विधानसभा निवडणुका घेण्याची मागणी करेन’, असे त्यांनी जाहीर केले. ‘जोवर जनता प्रामाणिकपणाचे प्रमाणपत्र देत नाही, तोवर मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसणार नाही. जेव्हा जनता सांगेल की, आम्ही प्रामाणिक आहोत, तेव्हाच मी मुख्यमंत्री व मनीष सिसोदिया उपमुख्यमंत्रिपदी विराजमान होऊ,’ असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
येत्या काही दिवसांत आम आदमी पार्टीच्या आमदारांची बैठक होईल. त्यात मुख्यमंत्रिपदासाठी नेत्याची निवड केली जाणार असल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. दिल्लीत फेब्रुवारीमध्ये विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. मात्र, महाराष्ट्रासोबत नोव्हेंबरमध्येच दिल्लीतही निवडणूक घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. अबकारी प्रकरणात अटक झाल्यानंतर सहा महिन्यांनी शुक्रवारी केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर दोनच दिवसांनी केजरीवाल यांनी राजीनाम्याचा नवा डाव टाकला. - आणखी वृत्त/७
लगेच का नाही : भाजप
nही एक भावनिक चाल आहे, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी केली.
nन्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केल्यामुळे ते मुख्यमंत्र्यांऐवजी एखादे नामधारी मंत्री झाले आहेत. त्यामुळे हे राजीनाम्याचे नाटक सुरू आहे.
nभाजप नेते हरीश खुराणा यांनी राजीनाम्यासाठी ४८ तास कशाला हवेत, असा प्रश्न करून आजच त्यांनी राजीनामा द्यायला हवा, असे म्हटले.
शहीद भगतसिंग यांच्या पत्रांचा उल्लेख
केजरीवाल यांनी शहीद भगतसिंग यांनी तुरुंगातून लिहिलेल्या पत्रांचा उल्लेख केला. ते म्हणाले, मी तिहार तुरुंगातून नायब राज्यपालांना साधे पत्र लिहिले तर मला थेट इशारा देण्यात आला. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना सहकाऱ्यांना भेटण्याची परवानगी होती. मला मात्र तशी परवानगीही नव्हती.
आतिशींचे नाव चर्चेत
‘आप’मधून मुख्यमंत्रिपदासाठी दिल्लीच्या शिक्षण व अन्य प्रमुख खात्यांच्या मंत्री आतिशी मार्लेना यांचे नाव आघाडीवर आहे. याशिवाय, आरोग्यमंत्री सौरभ भारद्वाज, मंत्री गोपाल राय, कैलाश गहलोत, कुलदीप कुमार आदींची नावांचीही चर्चा आहे.
केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांचेही नाव चर्चेत असून, आमदारांच्या बैठकीतच यावर ठोस निर्णय होईल.