केजरीवालांनी घेतली मोदींची भेटी; कोरोना व्हायरस, दिल्ली हिंसेवर केली चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 03:40 PM2020-03-03T15:40:31+5:302020-03-03T15:40:48+5:30
केंद्र सरकारसोबत मिळून कोरोना व्हायरसशी लढा दिला जाईल, असं केजरीवाल यांनी सांगितले.
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदी आणि केजरीवाल यांच्या भेटीत दिल्लीतील हिंसा आणि कोरोना व्हायरस यावर चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर केजरीवाल पहिल्यांदाच मोदींना भेटले.
दिल्लीत झालेल्या हिंसेसाठी जबाबदार असलेले लोक कोणत्याही पक्षाचे किंवा कोणत्याही धर्माचे असो सर्वांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केजरीवाल यांनी केली. यावेळी केजरीवाल यांनी दिल्ली पोलिसांच्या कामावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले. इशान्य दिल्लीत 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी तत्परता दाखवली असती तर एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना जीव गमवावा लागला नसता, असंही केजरीवाल यांनी मोदींना सांगितले.
अरविंद केजरीवाल यांनी या बैठकीला औपचारिक बैठक म्हटले. हिंसेसाठी जे जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करा. जेणेकरून अशा घटना पुन्हा सहन केल्या जाणार हा संदेश जाईल. तसेच भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी केंद्र सरकारसोबत मिळून प्रयत्न करू, असंही केजरीवाल यांनी म्हटले.
या भेटीत केजरीवाल यांनी कोरोनो व्हायरस संदर्भात देखील चिंता व्यक्त केली. दिल्लीत कोरोना व्हायरसचा रुग्ण आढळला आहे. ज्या देशात रुग्ण आढळतो, तिथे या व्हायरसची लागण झपाट्याने होती. त्यामुळे केंद्र सरकारसोबत मिळून कोरोना व्हायरसशी लढा दिला जाईल, असं केजरीवाल यांनी सांगितले.