ईव्हीएम मशिनमुळे पराभव झाल्यास आंदोलन छेडणार- केजरीवाल
By admin | Published: April 25, 2017 03:40 PM2017-04-25T15:40:10+5:302017-04-25T15:40:10+5:30
दिल्ली महापालिका निवडणुकीच्या एक्झिट पोलमुळे केजरीवालांच्या पायाखालची जमीन सरकल्याचं चित्र सध्या निर्माण झालं आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - दिल्ली महापालिका निवडणुकीच्या एक्झिट पोलमुळे केजरीवालांच्या पायाखालची जमीन सरकल्याचं चित्र सध्या निर्माण झालं आहे. आता केजरीवालांनी दिल्ली महापालिका निवडणुकीत ईव्हीएम मशिनमुळे पराभव झाल्यास आंदोलन छेडणार असल्याचं जाहीर करून टाकलंय. अधिक तर एक्झिट पोलमुळे केजरीवालांना निवडणुकीतल्या पराभवाची चिंता सतावते आहे. त्यामुळे केजरीवालांनी पुन्हा एकदा ईव्हीएम मशिनमधील बिघाडाचा मुद्दा उपस्थित केला आहे.
केजरीवालांनी पराभव झाल्यास त्याचं खापर ईव्हीएम मशिनवर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न चालवला आहे. केजरीवालांनी यासाठी ट्विटरवर एक व्हिडीओही अपलोड केला आहे. त्यात त्यांनी कार्यकर्त्यांना पराभव झाल्यास ईव्हीएम मशिनविरोधात आंदोलन छेडू, असंही म्हटलं आहे. केजरीवाल म्हणाले, जर आमचा पराभव झाला तर हे सिद्ध होईल की, पंजाब, यूपी, मुंबई, भिंड आणि धोलपूरमध्ये ईव्हीएम मशिनसोबत छेडछाड झाली आहे. आम्हाला सत्ता उपभोगायची नाही. तसेच ईव्हीएम मशिनसोबत होणा-या छेडछाडीमुळे मी चिंतेत आहे.
पंजाबच्या एका गावातून आम्हाला फक्त दोन मतं मिळाली आहेत. त्यावेळी त्यांनी दिल्लीतील एक उदाहरणही लोकांसमोर ठेवलं आहे. संजीव झाच्या विधानसभा क्षेत्रातील एक कॉलनी आहे. जिथे 100 टक्के मतदान झालं आहे. मात्र त्यातील 50 टक्के मतदान हे भाजपाला गेल्याचं दिसतं आहे. त्यामुळे आमच्या मनात शंका उपस्थित झाली आहे.