केजरीवालांना उद्या सरेंडर व्हावे लागणार; कोर्ट अंतरिम जामिनावर ५ जूनला निकाल देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 04:58 PM2024-06-01T16:58:41+5:302024-06-01T16:58:58+5:30
दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात घेरलेल्या केजरीवाल यांना गेल्या महिन्याच्या सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला होता.
आपचे राष्ट्रीय संयोजक, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राऊज अव्हेन्यू कोर्टाने दिलासा दिलेला नाही. यामुळे केजरीवाल यांना उद्या ठरल्याप्रमाणे तुरुंगात सरेंडर करावे लागणार आहे. यामुळे केजरीवाल यांचे निकालापूर्वीच तुरुंगात जाणे नक्की झाले आहे.
कोर्टाने केजरीवालांच्या अंतरिम जामिनाचा निकाल राखून ठेवला असून तो ५ जून रोजी दिला जाणार आहे. केजरीवाल याना निवडणुकीच्या प्रचारासाठी जामिन देण्यात आला होता. निवडणूक संपल्यानंतर त्यांना तुरुंगात पुन्हा जावे लागणार होते. हा जामिन आणखी आठवड्याभराने वाढविण्याची मागणी केजरीवाल यांनी केली होती.
यासाठी केजरीवाल यांनी त्यांच्या आरोग्याचे कारण दिले होते. त्यांना पीईटी, सीटी स्कॅन आणि अन्य काही टेस्ट करायच्या असल्याचे त्यांचे म्हणणे होते. यासाठी त्यांना सात दिवसांचा वेळ मिळावा अशी मागणी करण्यात आली होती. अटकेनंतर केजरीवालांचे वजन सात किलोंनी कमी झाल्याचा दावा आपने केला होता. तसेच त्यांची कीटोन लेव्हल खूप जास्त असल्याचेही म्हटले होते. यावर ईडीने केजरीवाल यांचे वजन कमी नाही तर उलट एक किलोने वाढल्याचा दावा केला होता.
दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात घेरलेल्या केजरीवाल यांना गेल्या महिन्याच्या सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला होता. दिल्ली उत्पादन शुल्क धोरण २०२१-२२ मधील (आता बंद पडलेल्या) कथित अनियमिततेशी संबंधित मनी लाँड्रिंग चौकशीच्या संदर्भात केजरीवाल यांना २१ मार्च रोजी ईडीने अटक केली होती. जामिन देताना सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना कोणत्याही साक्षीदाराशी बोलू नये असे निर्देश दिले होते.