खोकलामुक्तीसाठी केजरीवाल घेणार मोदींच्या योगगुरूंची मदत
By admin | Published: February 20, 2015 09:16 AM2015-02-20T09:16:36+5:302015-02-20T09:16:36+5:30
नरेंद्र मोदींचा सल्ला ऐकत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मोदींचे योगासनांचे गुरू एच. नागेंद्र यांच्याकडून खोकल्यावर उपचार घेण्याची शक्यता आहे.
ऑनलाइन लोकमत
राजकीय विरोधक असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सल्ला ऐकत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मोदींचे योगासनांचे गुरू एच. नागेंद्र यांच्याकडून खोकल्यावर उपचार घेण्याची शक्यता आहे. केजरीवाल व मोदी यांच्यामध्ये निवडणुकीदरम्यान चांगलेच वाकयुद्ध रंगले होते. परंतु ७० पैकी ६७ जागा जिंकत दिल्ली विधानसभा ताब्यात घेतलेल्या केजरीवाल यांचे मोदी यांनी लागलीच अभिनंदन केले. इतकेच नाही तर त्यांच्यात चाय पे चर्चा झाली असता केजरीवाल यांनी नागेंद्र यांच्याकडून खोकल्यावर उपचार करून घ्यावेत असा सल्लाही मोदींनी दिला.
नरेंद्र मोदी यांचा संबंध नागेंद्र यांच्याशी दशकापूर्वी आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक शेषाद्री यांचे नागेंद्र हे नातेवाईक आहेत. ते स्वत: जरी बेंगळूर येथे राहत असले तरी गुजरात सरकारमधल्या बहुतेक सर्व मंत्र्यांना योगासने व योगविद्येवर आधारीत जीवनशैलीचे मार्गदर्शन ते नियमित करतात.
आत्तापर्यंत दोन लाखांवर दम्याच्या रुग्णांना नागेंद्र यांनी बरे केले असल्याचे सांगितले जाते. अशा नागेंद्र यांच्या योग उपचारशैलीचा फायदा केजरीवाल घेतील आणि सगळ्यांच्या चेष्टेचा विषय झालेल्या खोकल्यापासून मुक्ती मिळवतिल अशी चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगलेली आहे.