दिल्लीतील प्रदुषणाबाबत केजरीवाल भेटणार हरियाणा आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2017 11:53 AM2017-11-08T11:53:17+5:302017-11-08T11:56:49+5:30
राजधानीतील प्रदुषणाची पातळी कमी करण्यासाठी वेगाने पावले उचलावी लागणार आहेत. यासाठीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पंजाब आणि हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत.
नवी दिल्ली- गेले दोन दिवस राजधानी दिल्लीमध्ये असणाऱ्या प्रदुषित वातावरणामुळे सर्वच नागरिक चिंतेत पडले आहेत. दिल्ली आणि परिसरामध्ये सकाळपासूनच धुरके तयार झाल्यामुळे दृश्यताही कमी झाली आहे. विविध राजकीय नेत्यांनी याचे खापर एकमेकांवर फोडले असले तरी आता राजधानीतील प्रदुषणाची पातळी कमी करण्यासाठी वेगाने पावले उचलावी लागणार आहेत. यासाठीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पंजाब आणि हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. 'मी हरियाणा आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना या पिकांचे पाचट जाळण्याच्या पद्धतीवर पर्याय शोधण्यासाठी पत्र लिहिणार असून त्यावर तोडगा काढण्यासाठी दोघांबरोबर बैठकीची विनंती केली आहे' असे केजरीवाल यांनी ट्वीट केले आहे.
Am writing letters to CMs of Punjab and Haryana requesting them for a meeting to find solns to crop burning
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) November 8, 2017
दिल्ली राजधानी क्षेत्र हे राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब या राज्यांनी वेढलेले आहे. या राज्यांमध्ये नवे पिक घेण्यासाठी शेतजमिनीवरच आधीच्या पिकाचे पाचट आणि इतर तण जाळले जातात. यामुळे मोठ्या प्रमाणात धूर होतो आणि परिणामी सर्वच क्षेत्राची हवा प्रदुषित होते. मागील वर्षी दिल्ली हायकोर्टाने या राज्यांना ही शेतजमिनीवर गवत, पाचट जाळण्याची पद्धती बंद करावी अशा अत्यंत कडक शब्दांमध्ये सूचना दिल्या होत्या. त्याचे पालन न झाल्यास संबंधित राज्याच्या मुख्य सचिवाला जबाबदार धरू असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यामुळे आर्द्रता आणि धूर एकत्रित होऊन धुरके तयार होत असल्याचे दिसून येते. कालपासून दिल्लीच्या हवेच्या गुणवत्ता अत्यंत खालावल्याचे दिसून येते. त्यामुळेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे गॅस चेंबर झाले आहे असे विधान काल केले होते. आजही तशीच स्थिती दिल्लीमध्ये कायम असल्याचे दिसून येत आहे. या धुरक्यामुळे दिल्लीतील दृश्यता (व्हिजिबिलिटी) देखिल कमी झाली आहे.
@ArvindKejriwal himself is asthmatic and he more than anyone else knows the crippling effect of air pollution. My appeal to him and to that generally somnambulant body called the NGT would be to address this as a crisis situation. India’s capital DELHI can’t be a gas chamber.
— SUHEL SETH (@suhelseth) November 7, 2017
लेखक सुहेल सेठ यांनी, केजरीवाल आपण स्वतः अस्थम्याचे रुग्ण आहात, आपण तात्काळ यावर पावले उचलावीत आणि राष्ट्रीय हरित लवादाला यावर काम करण्यासाठी भाग पाडावे अशा आशयाचे केजरीवाल यांना उद्देशून
रिट्वीट केले आहे.
जवानांना दिले ९००० मास्क
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जवानांना ९००० मास्कचे वाटप करण्याचे आदेश दिले आहेत. आयएसएफचे हे जवान विमानतळ, दिल्ली मेट्रो आणि अन्य सरकारी मंत्रालयात तैनात आहेत. खुल्या जागेत ड्युटी करत असलेल्या जवानांना विषारी वायूपासून बचाव करता यावा, म्हणून हे मास्क देण्यात आले आहेत. पोलिसांनाही असे मास्क दरवर्षी देण्यात येतात.