केजरीवाल जेलमधूनच बघणार लोकसभा निकाल, अंतरिम जामीन अर्जावरील निर्णय कोर्टाकडून ५ जूनपर्यंत राखून
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2024 05:57 AM2024-06-02T05:57:12+5:302024-06-02T06:05:46+5:30
दिल्ली मद्य धोरण प्रकरणात ईडीने अटक केलेले केजरीवाल यांनी दोन याचिका दाखल केल्या होत्या.
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या रविवारच्या तिहार तुरुंग वापसीवर राऊज ॲव्हेन्यूच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने शनिवारी शिक्कामोर्तब केले. केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनात वाढ करण्याच्या याचिकेवरील निर्णय ५ जूनपर्यंत राखून ठेवल्याने अंतरिम जामिनात सात दिवसांची वाढ होण्याची आशा मावळली.
दिल्ली मद्य धोरण प्रकरणात ईडीने अटक केलेले केजरीवाल यांनी दोन याचिका दाखल केल्या होत्या. त्यात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या अंतरिम जामिनात वाढ आणि नियमित जामीन मिळावा या मागण्या केल्या होत्या. न्यायमूर्ती कावेरी बावेजा यांच्या न्यायालयात यावर जोरदार युक्तिवाद झाला.
याचिका सुनावणीयोग्य नसल्याचा युक्तिवाद ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी केला. केजरीवाल यांनी २१ दिवसांच्या अंतरिम जामिनाच्या काळात वैद्यकीय चाचण्याऐवजी प्रचारसभांना संबोधित केले असून, ते आजारी नाहीत, हे स्पष्ट होते. त्यांचे वजन सात किलोंनी घटले नसून एक किलोने वाढल्याचा दावा केला.
अपाय झाल्यास जबाबदार कोण?
अरविंद केजरीवाल यांना १९९४ पासून मधुमेहाचा आजार असून, कलम २१ अंतर्गत त्यांना
राज्यघटनेकडून जगण्याचा अधिकार लाभला आहे. त्यांच्या शरीरात किटोनचा स्तर वाढला असून, त्याचा अर्थ मूत्रपिंड सामान्यपणे कार्यरत नाही.
केजरीवाल यांच्या शरीरात मोठे बदल होत असल्याचे संकेत असून, अशा स्थितीत त्यांच्या आरोग्याला अपाय झाल्यास जबाबदारी कोणाची असेल, असा सवाल केजरीवाल यांचे वकील एन. हरीहरन यांनी केला.