अनियमिततेच्या आरोपांवरून केजरीवालांची चौकशी सुरू
By admin | Published: January 25, 2017 01:00 AM2017-01-25T01:00:29+5:302017-01-25T01:00:29+5:30
रस्ते आणि मलनिस्सारण वाहिनीचे ठेके देण्यातील कथित अनियमिततेप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, त्यांचे मेहुणे आणि एका अभियंत्याची प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : रस्ते आणि मलनिस्सारण वाहिनीचे ठेके देण्यातील कथित अनियमिततेप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, त्यांचे मेहुणे आणि एका अभियंत्याची प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली आहे.
केजरीवाल व इतरांविरुद्ध रोडस् या भ्रष्टाचारविरोधी स्वयंसेवी संस्थेने तक्रार दिल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. आर्थिक गुन्हे शाखा याची चौकशी करीत असून, अद्याप प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आलेला नाही, असेही हा अधिकारी म्हणाला.
रोडस् अॅण्टी करप्शन आर्गनायझेशनच्या वतीने विधिज्ञ पांडे यांनी ही तक्रार दिली आहे. केजरीवाल, त्यांचे मेहुणे आणि बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र कुमार बन्सल, तसेच दिल्ली सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील तत्कालीन कार्यकारी अभियंता पी. के. कथुरिया यांनी संगनमताने भ्रष्टाचार केल्याचा त्यांचा आरोप आहे.
बन्सल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला (पीडब्ल्यूडी) बनावट बिले सादर करून सरकारी खजिन्याचे १० कोटी रुपयांचे नुकसान केले. कामांसाठी कोणत्याही साहित्याची खरेदी केली नसतानाही साहित्य खरेदीची बनावट बिले दाखल करून पैसे उकळण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.