नोटबंदीचा निर्णय मागे घ्या - केजरीवालांचे मोदींना आवाहन
By admin | Published: November 13, 2016 07:07 PM2016-11-13T19:07:30+5:302016-11-13T19:07:30+5:30
लोकांना होत असलेल्या प्रचंड त्रासामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी पंतप्रधानांनी नोटबंदीचा निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केली.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - नोटबंदीच्या निर्णयावरून आक्रमक झालेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदींवर चौफेर टीकास्त्र सोडले आहे. लोकांना होत असलेल्या प्रचंड त्रासामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी पंतप्रधानांनी हा निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केली.
नोटबंदीवरून मोदीविरोधात आघाडी उघणाऱ्या केजरीवाल यांनी आज संध्याकाळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मोदींवर आरोपांचा भडीमार केला. केजरीवाल म्हणाले, "मोदी देशवासियांना 50 दिवस संयम बाळगण्याचे आवाहन करत आहेत. पण जनता आता 50 तासांचा संयम बाळगण्याच्याही मन;स्थितीत नाही. संपूर्ण देशात आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे."
सरकारने काळ्यापैशाविरोधात कारवाईचे नाटक केले असून, अशा नाटकांनी सर्वसामान्यांचे पोट भरू शकेल का, असा टोलाही केजरीवाल यांनी लगावला. "पंतप्रधान म्हणतात ही केवळ 50 दिवसांची समस्या आहे. पण या काळात सगळी व्यवस्था बिघडून जाईल. त्यामुळे मोदीजी तुम्ही तुमचा अहंकार बाजूला ठेवा आणि नोटबंदीचा निर्णय मागे घ्या."असे केजरीवाल म्हणाले.