केजरीवालांच्या मुलीनेच ‘लाच’ देऊ केली तेव्हा...
By admin | Published: May 18, 2015 02:52 AM2015-05-18T02:52:49+5:302015-05-18T02:52:49+5:30
आम आदमी पार्टीची सत्ता येताच दिल्लीतील भ्रष्टाचार ७० ते ८० टक्के घटल्याचा दावा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी केला
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीची सत्ता येताच दिल्लीतील भ्रष्टाचार ७० ते ८० टक्के घटल्याचा दावा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी केला. माझ्या मुलीने एका अधिकाऱ्याला लाच देऊ केली पण ती घेण्यास तो अधिकारी धजावला नाही, असा एक किस्साही आपल्या या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांनी सांगितला.
जुन्या दिल्लीत बुराडी येथे आॅटोचालकांना संबोधित करताना केजरीवाल यांनी हा किस्सा ऐकवला. ते म्हणाले की, माझी मुलगी वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना काढण्यासाठी संबंधित विभागात गेली. एक सामान्य मुलगी या नात्याने ती गेली आणि रांगेत उभी झाली. आपली ओळख जाहीर न करता, एक महत्त्वपूर्ण दस्ताऐवज आपण आणला नसल्याचे तिने संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले; पण आवश्यक कागदपत्रे नसतील तर परवाना बनणार नाही, असे त्या अधिकाऱ्याने तिला निक्षून सांगितले. यानंतर माझ्या मुलीने त्या अधिकाऱ्यास पैसे देण्याची तयारी दाखवली. तिने पैसे देण्याची तयारी दाखवताच, त्या अधिकाऱ्याने तिच्या फोनकडे बघितले. व्हिडिओ शूटिंग तर करीत नाही ना, याची खातरजमा त्याने केली. माझ्या मुलीने तात्काळ परवाना हवा असल्याचे कारण सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)