दारूकांडाचे ९८ बळी, सीबीआय चौकशीची केजरीवाल यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 01:11 AM2020-08-03T01:11:03+5:302020-08-03T01:11:29+5:30
२५ अटकेत : सीबीआय चौकशीची केजरीवाल यांची मागणी
चंदीगड : पंजाबमध्ये विषारी दारू प्यायल्यामुळे मरण पावलेल्यांची संख्या आता ९८ वर पोहोचली असून, याप्रकरणी पोलिसांनी उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांसह आतापर्यंत २५ लोकांना अटक केली आहे. विषारी दारूकांडाची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.
विषारी दारूकांडातील बचावलेल्या काही लोकांनी नजर कमी झाल्याची आणि अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका टीष्ट्वटमध्ये आरोप केला आहे की, पंजाबमध्ये गेल्या काही महिन्यांत अवैध दारूच्या एकाही प्रकरणाची चौकशी करण्यात आलेली नाही. पंजाब सरकारच्या निषेधार्थ आप पक्षाने पतियाळा, बनार्ला, पठाणकोट, मोगा आदी ठिकाणी रविवारी निदर्शने केली. दरम्यान, उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी व पोलीस अवैध दारूच्या धंद्याला आळा घालण्यात अपयशी ठरले आहेत, असे अमरिंदरसिंग यांनी म्हटले आहे.
तेरा जणांना केले निलंबित...
विषारी दारूकांडप्रकरणी उत्पादन शुल्क खात्याच्या सात व पोलीस दलातील सहा जणांना निलंबित करण्यात आले आहे. विषारी दारू प्यायल्यामुळे मरण पावलेल्यांच्या वारसदारांना २ लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.