केजरीवाल यांचा दिल्ली पोलिसांवर अविश्वास
By admin | Published: January 20, 2016 03:18 AM2016-01-20T03:18:14+5:302016-01-20T03:18:14+5:30
दिल्लीच्या आम आदमी पार्टी सरकारने केंद्र सरकारच्या अधीन असलेल्या दिल्ली पोलिसांवर अविश्वास दर्शवीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या संरक्षणासाठी दहा खासगी
नवी दिल्ली : दिल्लीच्या आम आदमी पार्टी सरकारने केंद्र सरकारच्या अधीन असलेल्या दिल्ली पोलिसांवर अविश्वास दर्शवीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या संरक्षणासाठी दहा खासगी कमांडोंची तुकडी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
दिल्ली पोलिसांनी आपल्याला सुरक्षा पुरवावी, असे केजरीवाल यांना अजिबात वाटत नाही, असे आप सरकारने म्हटले आहे. केजरीवाल यांच्या सुरक्षेसाठी स्थापन केल्या जाणाऱ्या विशेष सुरक्षा दलात लवकरच दहा धडधाकट तरुणांची भर्ती करण्याचा आप सरकारचा विचार आहे. लोकांनी केजरीवाल यांना सार्वजनिक स्थळी त्रास देण्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. गेल्या रविवारीच एका तरुणीने त्यांच्यावर शाई फेकली होती.
केजरीवाल यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी दिल्ली सरकारच्या अंतर्गत असलेल्या मुलकी संरक्षण विभागातील दहा तरुण स्वयंसेवकांची भर्ती करण्याची सरकारची योजना आहे. केजरीवाल हे दिल्लीबाहेर जातील त्यावेळीही हे दहा कमांडो त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतील. ‘दिल्ली पोलिसांवर आमचा विश्वास नाही. मुख्यमंत्र्यांचे संरक्षण करण्यासाठी आम आदमी पार्टीचे स्वयंसेवक आहेत,’ असे पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने म्हटले आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)