दिल्ली विजयानंतर केजरीवालांची नजर आता देशभरातील स्थानिक निवडणुकांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 11:55 AM2020-02-15T11:55:26+5:302020-02-15T12:00:53+5:30
आम्ही मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक तयार करणार आहोत. त्यानंतर पक्ष देशातील सर्व स्थानिक निवडणुका लढवणार आहे. तसेच मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये 'आप' स्थानिक निवडणूक लढविण्याचा विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील शानदार विजयानंतर प्रोत्साहित झालेल्या आम आदमी पक्षाने दिल्लीच्या बाहेर पक्षविस्तार करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत 'आप' देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
'आप'चे वरिष्ठ नेते गोपाल राय म्हणाले की, पक्षाने सकारात्मक राष्ट्रवाद घेऊन पुढे जाण्याचे ठरवले आहे. त्यानुसारच पक्षाचा विस्तार करण्यासंदर्भात राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक बोलविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 'आप' पंजाबसह अनेक राज्यातील निवडणुका लढविणार आहे. राष्ट्रीय पातळीवर मोठ्या संख्येने स्वयंसेवक आणि देशभरात पक्षाचे कॅडर निर्माण करण्याचे पक्षाचे धोरण आहे. त्यातूनच संघटनेचा विस्तार करण्याची योजना बनविणार असल्याचे राय यांनी म्हटले आहे.
केजरीवाल सरकारमध्ये मंत्री राहिलेले राय यांनी, भाजपचा राष्ट्रवादावर टीका केली. भाजपचा राष्ट्रवाद नकारात्मक आहे. मात्र आम आदमी पक्ष सकारात्मक राष्ट्रवादाच्या मुद्दावर पक्षाचा विस्तार करणार आहे. लोक आपच्या राष्ट्र निर्माण अभियानात 9871010101 या क्रमांकावर मिस कॉल देऊन सामील होऊ शकतात. या अभियानाच्या माध्यमातून आम्ही मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक तयार करणार आहोत. त्यानंतर पक्ष देशातील सर्व स्थानिक निवडणुका लढवणार आहे. तसेच मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये 'आप' स्थानिक निवडणूक लढविण्याचा विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान भाजप पक्ष भारतातील लोकांचा सन्मान करत नाही. ते प्रत्येक व्यक्तीकडे केवळ व्होट बँक म्हणूनच पाहात असल्याचा आरोप राय यांनी केला.