गुजरात महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर केजरीवाल यांचं 'ट्विट चर्चेत'
By महेश गलांडे | Published: February 23, 2021 05:06 PM2021-02-23T17:06:11+5:302021-02-23T17:07:01+5:30
गुजरातमधील महापालिका निवडणुकीत भाजपाला चांगलं यश मिळाल आहे. मात्र, कायम भाजपाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमधील निवडणुकांच्या निकालानंतर केलेलं ट्विट चांगलंच चर्चेत आलंय.
नवी दिल्ली - गुजरातमध्ये झालेल्या सहा मोठ्या शहरांमधील महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपाने निर्विवाद विजयाच्या दिशेने आगेकूच सुरू केली आहे. (Gujarat municipal election 2021 Result ) आतापर्यंत आलेल्या कलांमध्ये भाजपाने सहा पैकी सहा महानगरपालिकांमध्ये स्पष्ट बहुमताच्या दिशेने आगेकूच केली आहे. अहमदाबाद, सूरत, बडोदा, राजकोट, जामनगर आणि भावनगर या महानगरपालिकांमध्ये भाजपाने विजयी आघाडी घेतली आहे. तर, सुरतमध्ये आम आदमी पक्षाने काँग्रेसला मागे टाकले आहे. त्यामुळे, येथील निकालानंतर आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल याचं ट्विट चर्चेत आलं आहे.
गुजरातमधील महापालिका निवडणुकीत भाजपाला चांगलं यश मिळाल आहे. मात्र, कायम भाजपाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमधील निवडणुकांच्या निकालानंतर केलेलं ट्विट चांगलंच चर्चेत आलंय. केजरीवाल यांनी आपल्या ट्विटरवरुन गुजरातमधील नागरिकांचे अभिनंदन केलंय. नवीन राजकारणाची सुरुवात करण्यासाठी गुजरातच्या लोकांना मनापासून शुभेच्छा, अभिनंदन ! असे केजरीवाल यांनी म्हटलंय. केजरीवाल यांच्या पक्षानेही महापालिका निवडणुकीत उमेदवार उभे केले होते. विशेष म्हणजे आपला येथील निवडणुकीत चांगलं यशही मिळालं आहे. त्यामुळे, केजरीवाल यांचं ट्विट चर्चेत आलं आहे.
नई राजनीति की शुरुआत करने के लिए गुजरात के लोगों को दिल से बधाई।
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) February 23, 2021
अहमदाबादमध्ये आतापर्यंत ११९ जागांचे कल समोर आली असून, त्यामध्ये भाजपाने १०१ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसला केवळ १८ जागांवर आघाडी मिळाली आहे. बडोदा महानगरपालिकेच्या ७६ पैकी ५३ जागांवर भाजपाने आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसच्या खात्यात केवळ ७ जागाच जाताना दिसत आहेत. सूरतमध्ये आतापर्यंत १२० जागांपैकी ६४ जागांचे कल समोर आले आहेत. त्यामध्ये भाजपा ५१ तर आप १३ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला मागे टाकत आम आदमी पक्ष येथे प्रमुख विरोधी पक्ष म्हणून पुढे येताना दिसत आहे. तर राजकोटमध्येही भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. येथील ७२ पैकी ५२ जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत तर काँग्रेसला केवळ ४ जागांवर विजय मिळाला आहे.