कपिल मिश्रांना केजरीवालांच्या पत्नीचे चोख उत्तर

By Admin | Published: May 15, 2017 05:51 PM2017-05-15T17:51:44+5:302017-05-15T17:51:44+5:30

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंत्रीमंडळातून बडतर्फ केल्यानंतर कपिल मिश्रा यांनी केजरीवाल आणि आम आदमी पक्षावर खळबळजनक आरोपांची मालिका सुरू केली आहे.

Kejriwal's wife's apt reply | कपिल मिश्रांना केजरीवालांच्या पत्नीचे चोख उत्तर

कपिल मिश्रांना केजरीवालांच्या पत्नीचे चोख उत्तर

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 -  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंत्रीमंडळातून बडतर्फ केल्यानंतर कपिल मिश्रा यांनी केजरीवाल आणि आम आदमी पक्षावर खळबळजनक आरोपांची मालिका सुरू केली आहे. अरविंद केजरीवालांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे.
 
केजरीवालांच्या आरोपावरून आता त्यांच्या बचावासाठी केजरीवालांच्या पत्नी सुनिता केजरीवाल मैदानात उतरल्या आहेत. ट्विटरद्वारे त्यांनी कपिल मिश्रा चुकीचे आरोप करत असून त्यांनी विश्वासघात करत असल्याचं थेट म्हटलं आहे. तसेच जर केजरीवालांनी पैसे घेतले आणि ते मिश्रांनी बघितलं तर कधी घेतले हे का नाही सांगत असा सवालही त्यांनी मिश्रांना केला आहे. 
 
काय आहेत सुनिता यांचे ट्विट-
"मला दीदी म्हणायचे...घरात 2 कोटी आले तर किमान सांगायचं तरी...बरं 5 तारखेला केव्हा आला होतात ते तरी सांगा... तुमच्यासाठी चहा तरी केला असता" असं ट्विट करून त्यांनी कपिल मिश्रांच्या आरोपांचं एकप्रकारे खंडनच केलं आहे.
या  ट्विटनंतर आणखी एक ट्विट करून कपिल मिश्रा चुकीचे आरोप करत असून त्यांनी विश्वासघात करत असल्याचं थेट म्हटलं आहे.
त्यांच्या ट्विट्सना कपिल मिश्रांनी उत्तर देत ‘सुनीता केजरीवाल यांना सत्य परिस्थिती माहित नाही, त्यांच्याच घरात किती कुकृत्य केले जातात याची त्यांना कल्पना नाही. पतीच्या पराभवामुळे त्या चिंतेत आहेत... त्यांच्याविरोधात मी काहीही बोलणार नाही..." असं ट्विट मिश्रांनी केलं.
 
 

दिल्लीतील मंत्री सत्येंद्र जैन यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 2 कोटी रूपये दिले असा सनसनाटी आरोप करून कपिल मिश्रांनी आज दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. जैन हे केजरीवालांच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. दुसरीकडे आपने त्यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना सिसोदिया म्हणाले, कपिल मिश्रांनी केलेले आरोप अत्यंत खालच्या दर्जाचे असून हे सर्व आरोप निराधार आहे. प्रतिक्रिया देण्यासारखे हे आरोप नाही असे सिसोदिया यांनी म्हटले आहे. त्यांनी केलेले आरोप हे पूर्णपणे बिनबुडाचे असून कोणत्याही आधाराशिवाय हे आरोप करण्यात आल्याचं ते म्हणाले. मात्र, मिश्रा यांच्या या आरोपांमुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शनिवारी दिल्लीतील मंत्रिमंडळातून कपिल मिश्रा यांची हकालपट्टी करण्यात आली होती. रविवारी सकाळी कपिल मिश्रा यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांची भेट घेतली. राज्यपालांच्या भेटीनंतर कपिल मिश्रा यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केजरीवाल यांच्यावर आरोप केले. ‘परवा रात्री दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांनी अरविंद केजरीवाल यांना माझ्यासमोर दोन कोटी रुपये दिले. हा प्रकार बघून मला रात्रभर झोप आली नाही’ असे कपिल मिश्रांनी सांगितले. मी हे पैसे कशासाठी दिले याची विचारणा केजरीवालांकडे केली. पण त्यांनी यावर ठोस उत्तर देणे टाळले असा दावा त्यांनी केला. तसेच मी भ्रष्टाचारविरोधी पथकाला पत्र लिहिल्यानं मला हटवण्यात आलं असं ते म्हणाले. याशिवाय केजरीवाल यांच्या एका नातेवाईकासाठी 50 कोटी रुपयांचं "डील" केल्याचं सत्येंद्र जैन यांनी आपल्याला सांगितलंय, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. या गंभीर आरोपांमुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हे पैसे कुठून आले आणि कशासाठी देण्यात आले याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Web Title: Kejriwal's wife's apt reply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.