केरळात १.२४ लाख विद्यार्थ्यांना नाही जात-धर्म, शालेय शिक्षणापासूनच जात-धर्मनिरपेक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 03:45 AM2018-03-29T03:45:49+5:302018-03-29T03:45:49+5:30
मात्र हे यंदा पहिल्यांदाच घडलेले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून अनेक विद्यार्थी आपला धर्म व जात यांची माहिती देत नाहीत
कोची : प्रत्येक शैक्षणिक वर्षात केरळमध्ये खासगी आणि सरकारी शाळांमध्ये दाखल होणारी अधिकाधिक मुले आम्ही कोणत्या विशिष्ट धर्माची किंवा जातीची नाहीत, असे सांगत आहेत. यावर्षी केरळमध्ये १.२४ लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना भरावयाच्या अर्जातील जात व धर्माचा रकाना रिकामा सोडून दिला, असे सरकारने जाहीर केले आहे. याचाच अर्थ ती मुले खऱ्या अर्थाने सेक्युलर वा जात तसेच धर्मनिरपेक्ष आहेत, असा लावला जात आहे.
राज्य विधानसभेच्या सुरू असलेल्या अधिवेशनात बुधवारी प्रश्नोत्तर तासात वामनपूरमचे आमदार डी. के. मुरली (सीपीएम) यांनी प्रवेश घेताना किती विद्यार्थ्यांनी जात व धर्माच्या माहितीचा रकाना रिकामा सोडला, असे विचारले होते. या प्रश्नाला उत्तर देताना शिक्षणमंत्री सी. रवींद्रनाथ म्हणाले की, पहिली ते दहावीच्या १,२३,६३० विद्यार्थ्यांनी आम्ही कोणत्याही जातीचे वा धर्माचे नसल्याचे जाहीर केले. (वृत्तसंस्था)
ना तणाव, ना विद्वेष
मात्र हे यंदा पहिल्यांदाच घडलेले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून अनेक विद्यार्थी आपला धर्म व जात यांची माहिती देत नाहीत, असे दिसून आले आहे. आम्ही कोणत्याही विशिष्ट जात वा धर्माचे नाही, असे शाळेतील विद्यार्थीही उघडपणे सांगतात. केरळमध्ये हिंदूंप्रमाणेच मुस्लीम व ख्रिश्चन लोकसंख्या मोठी आहे. तरीही तिथे धार्मिक वा जातीय तणाव शक्यतो निर्माण होत नाही. त्याचेही जात वा
धर्म न मानणे हेच कारण आहे, यामुळेच भाजपाला अद्याप इथे पाय रोवता आलेले नाहीत, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.