Kerala Assembly Election: विराेधी पक्षनेते भाजप सरकारचे समर्थक; मुख्यमंत्री विजयन यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 05:56 AM2021-03-28T05:56:56+5:302021-03-28T05:57:22+5:30
विजयन यांनी संघ परिवारावर ‘केआयआयएफबी’सारख्या संस्था नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आराेप केला.
काेची : केरळमध्ये केंद्रीय तपास यंत्रणा विध्वंसक हालचाली करत असून विराेधात असलेली काँग्रेसप्रणीत यूडीएफ आघाडी त्यांच्याच सुरात सूर मिळवीत असल्याचा आराेप मुख्यमंत्री पी. विजयन यांनी केला. काेचीमध्ये ते प्रचारसभेत बाेलत हाेते.
विजयन यांनी संघ परिवारावर ‘केआयआयएफबी’सारख्या संस्था नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आराेप केला. केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्याचे नुकसान हाेत असून यूडीएफ या संस्थांच्या कारवायांना समर्थन देत असल्याचा आराेप केला. राज्यातील विराेधी पक्षनेते आणि यूडीएफचे नेते रमेश चेन्नीतला हे भाजप सरकारचे मजबूत समर्थक बनल्याची टीकाही विजयन यांनी केली. तसेच काँग्रेसकडून राज्य सरकारच्या ‘लाइफ मिशन’सारख्या याेजनांचे नुकसान हाेत असल्याचेही विजयन म्हणाले.
नड्डांचे सत्ताधाऱ्यांवर शरसंधान
काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या विचारधारेवर जाेरदार हल्ला चढविताना शबरीमाला मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सत्ताधाऱ्यांवर शरसंधान केले. केरळच्या चकरक्कल येथे नड्डा यांचा राेड शाे आयाेजित करण्यात आला हाेता. त्यानंतर आयाेजित सभेत नड्डा यांनी शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरून सरकारवर महिलांचे आंदाेलन चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आराेप केला. माजी पंतप्रधान मनमाेहन सिंग यांच्यावर टीका करताना नड्डा म्हणाले, शबरीमालाबाबत केवळ भाजपने सातत्य दाखविले आहे. २०११ मध्ये शबरीमाला येथे चेंगराचेंगरीत १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला हाेता. त्यावेळी सिंग यांनी भेटही दिली नव्हती. याउलट २०१६ मध्ये फटाक्यांच्या साठ्याचा स्फाेट झाल्यामुळे ११४ जणांचा मृत्यू झाला हाेता, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र माेदींनी घटनास्थळी भेट दिली हाेती, असे नड्डा म्हणाले.
सोनेतस्करीचा मुद्दा
साेन्याच्या तस्करीमध्ये थेट मुख्यमंत्री कार्यालय गुंतल्याचाही आराेप नड्डा यांनी केला. नड्डा म्हणाले, केंद्रीय यंत्रणेद्वारे तपास करण्याची मागणी त्यांनीच केली हाेती. मात्र, तपास यंत्रणांचे हात मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पाेहाेचल्यानंतर केंद्र सरकारवर आराेप केले. सत्ताधारी पक्ष विचारधारेच्या बाबतीत संभ्रमित आहेत. केरळमध्ये ते एकमेकांच्या विराेधात लढतात, मात्र, पश्चिम बंगालमध्ये त्यांनी हातमिळवणी केली आहे, अशी टीका नड्डा यांनी केली.