केरळमधील मुलाचा ब्लू व्हेल चॅलेंजमुळे बळी?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2017 02:08 PM2017-08-16T14:08:18+5:302017-08-16T14:35:38+5:30
केरळमधील तिरुअनंतपुरममध्ये एका 16 वर्षीय मुलाने ब्लू व्हेल गेम चॅलेंजच्या नादात आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे.
तिरुअनंतपुरम, दि. 16 - जीवघेणा ऑनलाइन गेम 'ब्लू व्हेल चॅलेंज'च्या जाळ्यामुळे लहान मुलांचे शिकार होण्याचे प्रमाण वाढत चालल्याचे निदर्शनास येत आहे. केरळमधील तिरुअनंतपुरममध्ये एका 16 वर्षीय मुलाने ब्लू व्हेल गेम चॅलेंजच्या नादात आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. 26 जुलै रोजी तिरुअनंतपुरममधील विलापिलसलाजवळ एका शाळकरी मुलानं गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आपला तपास सुरू केला आहे. आत्महत्या केलेल्या मुलाच्या आईचे असे म्हणणे आहे की, ब्लू व्हेल गेमच्या नादात त्यांच्या मुलाने आत्महत्या केली. मुलाच्या आईनं एका टीव्ही चॅनेलला सांगितले की, त्यांच्या मुलाने नोव्हेंबर 2016 मध्ये ब्लू व्हेल गेम डाउनलोड केला होता. पुढे त्यांनी असेही सांगितले की, त्यांनी आपल्या मुलाला हा जीवघेणा ब्लू व्हेल गेम खेळू नकोस, असे अनेकदा बजावलेदेखील होते. धक्कादायक म्हणजे त्यांच्या मुलाने यापूर्वीही दोनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ज्यामुळे तो गंभीर जखमीदेखील झाला होता. एकदा त्यानं कर्कटकच्या सहाय्याने स्वतःला जखमीदेखील करुन घेतले होते. दुस-या वेळेस त्यानं नदीत उडी मारली होती. सुदैवानं दोन्ही वेळेस तो वाचला होता, असे त्यांच्या आईनं सांगितले.
दरम्यान, आत्महत्या केलेल्या मुलाच्या आईनं दिलेल्या माहितीच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Kerala: Investigation team collecting evidence from Manoj's house, who committed suicide under suspected influence of 'Blue Whale' game pic.twitter.com/WYotySM2bs
— ANI (@ANI) August 16, 2017
दरम्यान, जगभरात धुमाकूळ घालणा-या जीवघेण्या ब्ल्यू व्हेल चॅलेंज गेमबाबतच्या सर्व लिंक तातडीने काढून टाकण्याचे आदेश केंद्र सरकारने सर्व सोशल मीडिया साइट्सना दिले आहेत. इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून या गेमची किंवा त्यासंबंधित असलेली लिंक तातडीने हटवावी, असे पत्र इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने गुगल, फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि याहू यासारख्या वेबसाइट्सना पाठविले आहे.
ब्ल्यू व्हेल चॅलेंजमुळे भारतात अनेक ठिकाणी मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबई आणि पश्चिम बंगालमध्येही अशा घटना काही दिवसांपूर्वी घडल्या होत्या. त्यामुळे या गेमवर बंदी घालण्याची मागणी सर्व स्तरातून जोर धरत होती. २०१३ साली रशियात फिलिप ब्यूडेइकिन व त्याच्या साथीदारांनी ब्ल्यू व्हेल चॅलेंज डेव्हलप केले. ब्ल्यू व्हेल म्हणजे एक वेगवेगळे टास्क देणारा अॅडमिनिस्ट्रेटर आहे. आॅर्डर देणारी व्यक्ती अज्ञात असते. एकदा या खेळात लॉग इन केले की तो वेगवेगळे चॅलेंज देतो. साधारणत: ५0 टप्पे ओलांडावे लागतात. या टप्प्याची प्रगती सोप्यापासून अवघड लेव्हलच्या दिशेने होते. शेवटी खेळणा-याला आत्महत्या करण्याचे आव्हान दिले जाते.
पालकांनो हे कराच...
मुले कोणता गेम खेळतात,
याकडे लक्ष द्या.
त्यांच्याशी संवाद साधा, समजून घ्या.
मुला-मुलींना ओरडण्यापेक्षा त्यांच्यासोबत वेळ घालवा.
मित्र-मैत्रिणींच्या दबावाखाली कोणतीही गोष्ट करण्यापासून रोखा.
चांगले आणि वाईट काय, हे
त्यांच्या भाषेत सांगा.
ब्ल्यू व्हेल चॅलेंज टास्क : हातावर ब्लेडने ब्ल्यू व्हेलचे चित्र रेखाटणे, हाताच्या नसा कापणे, ओठांवर ब्लेडने कापणे, पहाटे एखाद्या उंच ठिकाणी जाणे, पहाटे उठून हातावर वार करणे, हॉरर चित्रपट पाहणे, गच्चीवरून उडी मारणे
या हॅशटॅग्सपासून सावध राहा
‘दी ब्ल्यू व्हेल चॅलेंज’पासून वाचण्यासाठी #curatorfindme #iamawhale #thebluewhale #wakemeupat420 या हॅशटॅग्सपासून लांबच राहा.