बाबा रामदेव यांच्या अडचणीत वाढ, केरळ कोर्टाचे अजामीनपात्र वॉरंट; नेमके प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 10:27 IST2025-02-02T10:27:26+5:302025-02-02T10:27:43+5:30
Baba Ramdev: पतंजलि उत्पादनांवरून बाबा रामदेव यांच्याविरोधात खटले दाखल करण्यात आले असून, त्यावर सुनावणी सुरू आहे.

बाबा रामदेव यांच्या अडचणीत वाढ, केरळ कोर्टाचे अजामीनपात्र वॉरंट; नेमके प्रकरण काय?
Baba Ramdev: गेल्या काही दिवसांपासून योगगुरू बाबा रामदेव यांच्या अडचणी वाढताना पाहायला मिळत आहेत. देशातील काही न्यायालयांमध्ये पतंजलिच्या उत्पादनांसंदर्भात खटले दाखल करण्यात आले आहेत. यातच केरळमधील एका न्यायालयाने बाबा रामदेव आणि पतंजलि योगपीठाचे अध्यक्ष आचार्य बालकृष्ण यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पलक्कड जिल्हा न्यायालयाने एका याचिकेच्या सुनावणीवेळी बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण गैरहजर राहिल्यामुळे हे अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. केरळच्या ड्रग्ज इन्स्पेक्टरने दिव्या फार्मसीविरुद्ध दाखल केलेल्या फौजदारी खटल्याच्या सुनावणीला हे दोघेही उपस्थित राहू शकले नाहीत. न्यायालयाने दोघांविरुद्ध १५ फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. यापूर्वी १ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी केले होते, जेणेकरून ते न्यायालयात हजर राहू शकतील. हे प्रकरण दिव्या फार्मसीने प्रकाशित केलेल्या कथित दिशाभूल करणाऱ्या वैद्यकीय जाहिरातींशी संबंधित आहे. यावर केरळ ड्रग्ज इन्स्पेक्टरने कारवाई केली.
तत्पूर्वी, पतंजलि कापूर उत्पादनांच्या विक्रीवर बंदी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पतंजलिला ४ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ने बाबा रामदेव यांच्यावर कोरोना बरा करण्याचा दावा केल्याचा आणि आधुनिक औषधांना निरुपयोगी म्हणल्याचा आरोप केला होता.
दरम्यान, योगगुरू बाबा रामदेव आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड यांच्याविरुद्ध अनेक खटले दाखल आहेत. यामध्ये दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, ट्रेडमार्क उल्लंघन यासारख्या प्रकरणांचा समावेश आहे. या प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव आणि पतंजलीला दिलासा दिला असला तरी, पुन्हा न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन केले तर शिक्षा होऊ शकते, अशी ताकीद न्यायालयाने दिली होती.