Kerala Floods : केरळच्या मदतीला २४ विमाने, ७२ हेलिकॉप्टर, इस्रोचे ५ उपग्रह!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:12 AM2018-08-20T00:12:29+5:302018-08-20T06:44:56+5:30
पावसाची, साचलेल्या पाण्याची माहिती तत्काळ सरकारच्या हाती
तिरुवनंतपुरम : जलप्रलयामुळे हाहाकार माजलेल्या केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ७२ हेलिकॉप्टर, २४ विमाने, ५४८ मोटरबोटी तसेच नौदल, लष्कर, हवाई दल, तटरक्षकदल तसेच राष्ट्रीय आपत्ती निवारण दलचे हजारो जवान सहभागी झाले आहेत. इस्रोच्या पाच उपग्रहांचाही सिंहाचा वाटा आहे.
पूरग्रस्त भागात अडकलेल्यांची सुखरुप सुटका करणे, त्यांना अन्नधान्याची पाकिटे पोहोचविणे असे विविधांगी मदतकार्य वेगाने सुरु आहे. राज्य सरकारने केलेल्या मागणीनूसार मदतकार्यासाठी केंद्राने तातडीने ६९०० लाइफजॅकेट, १६७ इनफ्लॅटेबल टॉवर लाइट, २१०० रेनकोट, १३०० गमबूट, १५३ चेन सॉ आदी सामुग्री पुरविली आहे. प्रवासी विमान सेवेसाठी कोचीचे नौदलाच्या हवाई तळाचा वापर करण्यास केंद्राने परवानगी दिली आहे. पुराचे पाणी धावपट्टीवर शिरल्याने कोची विमानतळ सध्या बंदच आहे.
ओशनसॅट-२, रिसोर्ससॅट-२, कार्टोसॅट-२, कार्टोसॅट-२ए, इन्सॅट ३डीआर या पाच उपग्रहांचाही मदतकार्यात सिंहाचा वाटा आहे. पूरस्थितीवर हे उपग्रह लक्ष ठेवून आहेत. त्यांच्याकडून मिळणाऱ्या माहितीमुळे मदतकार्य वेगाने पार पाडणे शक्य होत आहे. इस्रोच्या सूत्रांनी सांगितले की, हवामान, पाऊस कोसळण्याआधी व नंतर त्या भागात किती पाणी साचले आहे, पूरस्थिती कशी आहे याबद्दलची
सारी माहिती या पाच उपग्रहांकडून मिळते.
महाराष्ट्रातून राजकीय पक्षांचे सहकार्य
महाराष्ट्रातील काँग्रेसच्या आमदारांनी आपले एक महिन्याचे वेतन केरळ पूरग्रस्तांसाठी द्यायचे ठरविले असल्याची घोषणा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर रविवारी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील सर्व आमदार, खासदारही आपले एक महिन्याचे वेतन केरळ पूरग्रस्तांसाठी देणार असल्याचे त्या पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले. शिवसेनेचे लोकसभेतील खासदार राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे यांनीही एक महिन्याचे वेतन केरळ मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिले आहे.
विविध राज्यांतून मदतीचा ओघ वाढला
केरळसाठी जम्मू काश्मीरने २ कोटी, पश्चिम बंगालने १० कोटी, हिमाचल प्रदेशने ५ कोटी, मध्य प्रदेशने १० कोटी, उत्तर प्रदेशने पैसे व वस्तू स्वरुपांत १५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली. आंध्र प्रदेशमधील आयएएस अधिकाऱ्यांनी त्यांचे एक दिवसाचे वेतन देऊ केले आहे. पश्चिम रेल्वेने ९ लाख लिटर पिण्याचे पाणी एका विशेष रेल्वेगाडीने केरळला रवाना केले. विविध राज्यांतील सरकारे तसेच खाजगी संस्थांकडून पाठविण्यात येणाऱ्या वस्तूंच्या वाहतूकीसाठी कोणतेही शुल्क न आकारण्याचे रेल्वेने ठरविले आहे. पुडुचेरीमधील आमदार व खासदारांनी एक महिन्याचे वेतन केरळ पूरग्रस्त मदतनिधीसाठी द्यावे असे आवाहन मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनी केले आहे.
राष्ट्रपतींनी घेतली माहिती
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केरळचे राज्यपाल पी. सदाशिवन व मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याशी रविवारी दूरध्वनीवरुन संपर्क साधून राज्यातील पाऊस व पूरग्रस्त स्थितीची माहिती घेतली. संपूर्ण देश केरळच्या पाठीशी उभा असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले.
‘राष्ट्रीय आपत्ती जाहीर करा’
केरळमधील पूरस्थिती ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. केरळप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षपातीपणे वागू नये. या राज्याला केंद्राने ५०० कोटी रुपयांची मदत केली असली तरी अजून निधीची गरज आहे असेही त्यांनी यासंदर्भात केलेल्या टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे.
बॉलिवूडचे मदतीचे आवाहन
केरळमधील पूरग्रस्तांना प्रत्येकाने सढळहस्ते मदत करावी असे आवाहन बिगबी अमिताभ बच्चन यांनी केले आहे. यासंदर्भातील टिष्ट्वटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, नैसर्गिक आपत्तीमुळे या राज्यात निर्माण झालेली स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. बॉलिवूडमधील करण जोहर, वरुण धवन, हृतिक रोशन, शाहिद कपूर, आलिया भट, अनुष्का शर्मा आदींनी केरळमधील जनतेला सर्वांनी मदत करावी असे आवाहन सोशल मिडियाद्वारे केले आहे. शाहरुख खानच्या संस्थेने केले २१ लाख रुपयांचे सहाय्य केले.
पूरग्रस्तांसाठी संयुक्त अरब अमिराती (यूएइ)मधील भारतीयवंशीय उद्योगपतींनी १२ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. संयुक्त अरब अमिरातीनंतर कतारने केरळसाठी ३४.८९ कोटी रुपयांची मदत रविवारी जाहीर केली आहे.
बचावकार्य करणारे सहाजण बोटीसह बेपत्ता : बचावकार्यात सक्रिय असलेले सहा जण बोटीसह बेपत्ता झाल्याची घटना चेनगनूर येथील पनदानद भागात शनिवारी रात्री घडली आहे.