Kerala Floods : राज्याकडून आणखी ३० टन सामग्री केरळला रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 02:19 AM2018-08-20T02:19:00+5:302018-08-20T02:19:46+5:30
स्वयंसेवी संस्थांचाही पुढाकार; वायुदलाच्या विमानाचा वापर
मुंबई : भीषण पुरात सापडलेल्या केरळच्या मदतीसाठी महाराष्ट्रातूनही मदतीचा ओघ सुरू आहे. पहिल्या टप्प्यात ६.५ टन सामग्री पाठविल्यानंतर रविवारी भारतीय वायुदलाच्या विमानाने राज्य शासनाकडून आणखी ३० टन साधनसामग्री पाठविण्यात आली आहे. सोमवारी सकाळी आणखी पाच टन साहित्य रवाना करण्यात येणार आहे.
विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अन्न पाकिटे, दूध पावडर, ब्लँकेट्स, बेडशीट, कपडे, साबण, सॅनिटरी नॅपकिन्स आदी साहित्य पाठविण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडून २० कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा आधीच केली आहे. तसेच केरळ पूरग्रस्तांच्या मदतकायार्साठी एक नियंत्रण कक्ष मंत्रालयात कार्यान्वित करण्यात आला आहे. राज्य सरकारसोबत एमसीएचआय-क्रेडाई, राजस्थानी वेल्फेअर असोसिएशन, जितो इंटरनॅशनल, रिलायन्स रिटेल यासारख्या विविध संस्था, संघटना या कामात करत आहेत. बृहन्मुंबई महापालिका, मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, राजशिष्टाचार आदी विभागही या मदत कार्यात गुंतलेले आहेत.
केरळ भवनात २०० टन साहित्य
नवी मुंबईतल्या केरळ भवनमध्येही सुमारे २०० टन साहित्य जमा झाले आहे. त्यापैकी सुमारे दीडशे टन साहित्य नेव्ही व कोस्टगार्डच्या बोटीतून, तसेच रोरोमार्फत पाठविण्यात आले आहे. तसेच सौदी येथून केरळला निघालेल्या २० व्यक्ती कोची विमानतळ बंद असल्याने शनिवारी मुंबई विमानतळावर उतरल्या होते. त्यांनी भवनमध्ये आश्रय घेतला आहे.
च्मुंबईहून नौदलाची ‘आयएनएस दीपक’ ही नौका कोचीनला पोहोचली आहे. ८ लाख लीटर पाणी, १३ हजार ५९२ किलो खाद्यान्न, ४८८ किलो धान्य, १२२८ किलो जेवणाची पाकिटे, ३४०० पाण्याच्या बाटल्या व ३१०० पाणी पिशव्या घेऊन टँकर श्रेणीतील हे जहाज रविवारी सायंकाळी कोचिनला पोहोचले.
च्अहमदनगर येथील स्रेह ग्रुपच्या सदस्यांनी २०० ब्लँकेट पाठविले आहेत. तसेच युवान या सामाजिक संस्थेमार्फत व ‘आय लव्ह नगर’ या संस्थेच्या सहकार्यानेही पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करण्यात येणार आहे. वाशिम जिल्हा परिषदेनेही पुढाकार घेत अधिकारी, कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन आपत्तीग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.